राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत तालुक्यात 98.81 टक्के मतदान | पुढारी

राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत तालुक्यात 98.81 टक्के मतदान

कर्जत(नगर); पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यात 98.81 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांनी दिली. आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीच्या 18 जागांसाठी मतदान झाले. तालुक्यामध्ये कर्जत, कुळधरण, राशीन, माहिजळगाव व मिरजगाव असे पाच मतदान केंद्र मतदानासाठी ठेवण्यात आले होते.

असे पाच केंद्र ठेवल्यामुळे मतदानासाठी कुठेही गर्दी झाली नाही व मतदारांचाही वेळ वाचत होता. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यामुळे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र सुरळीत व शांततेने मतदान झाले.

कोण बाजी मारणार

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी सर्वांत लक्षवेधी झाली. याचे प्रमुख कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार, राज्याचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या वेळी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी पॅनल तयार करण्यात आला होता यामध्ये भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे व आरपीआय हे मित्रपक्ष एकत्र आले होते.

आमदार रोहित पवार यांनी सहकार शेतकरी पॅनल उभा केला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे आघाडी करण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्राची सरचिटणीस रवींद्र कोठारी यांनी देखील काही जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे करून तिसरी आघाडी तयार केली.

आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे या दोघांनीही या निवडणुकीमध्ये प्रचाराची राळ उठवली. आरोप प्रत्यारोप झाले. मतदारांच्या गाठीभेटी बरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये बैठका घेण्यात आल्या.

आज मतमोजणी

उद्या सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांनी दिली.
विभाग जागा एकूण झालेले

मतदान मतदान
सेवा संस्था 11 972 962
ग्रामपंचायत 4 846 835
व्यापारी/आडते 2 468 453
हमाल/मापाडी 1 292 287
एकूण 18 2577 2537

Back to top button