नगर जिल्ह्याला नुकसान भरपाईसाठी हवे 34.50 कोटी रुपये | पुढारी

नगर जिल्ह्याला नुकसान भरपाईसाठी हवे 34.50 कोटी रुपये

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 7 ते 16 एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने 19 हजार 856 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 34 हजार 458 शेतकर्‍यांना बसला. या बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अदा करण्यासाठी 34 कोटी 50 लाख 11 हजार 200 रुपये अनुदानाची आवश्यकता आहे.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.  मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातदेखील अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. 7 ते 16 एप्रिल या दहा दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने कांदा, मका व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना शासनाच्या वतीने नुकसानभरपाई दिली जात आहे. त्यानुसार दहा दिवसांत झालेल्या फळे आणि शेतपिकांच्या अंतिम नुकसानीचा तसेच शेतकर्‍यांसाठी आवश्यक असणारी आर्थिक मदतीचा अहवाल अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर नुकसानभरपाई बाधित शेतकर्‍यांना मिळणार आहे.

7 ते 16 एप्रिल या कालावधीत वादळी वारा, गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीचा फटका श्रीरामपूर तालुका वगळता उर्वरित 13 तालुक्यांतील 227 गावांना बसला आहे. या गावांतील 19 हजार 856 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 308 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचा समावेश आहे.

नेवासा तालुक्यात सर्वाधिक 6 हजार 795 हेक्टर नुकसान झाले आहे. यामध्ये 372 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचा समावेश आहे. या तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाईसाठी 11 कोटी 75 लाख 64 हजार रुपयांचा निधी शेवगाव तालुक्यातदेखील 4 हजार 844 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

नवीन दरानुसार नुकसानभरपाई

शासनाने नुकसानभरपाई देण्यासाठी 27 मार्च 2023 रोजी नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार जिरायती पिकांसाठी आता 8 हजार 500 रुपये, बागायती पिकांसाठी 17 हजार तर फळबागांसाठी 22 हजार 500 रुपये हेक्टरी अनुदान बाधित शेतकर्‍यांना फक्त दोन हेक्टरपर्यंत मिळणार आहे.

एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर)

नगर 1443, पारनेर 3194, पाथर्डी 5.30, कर्जत 107.60, जामखेड 16.29, श्रीगोंदा 704, राहुरी 481, नेवासा 6795, शेवगाव 4844, संगमनेर 1190, अकोले 652, कोपरगाव 167, राहाता 255.

Back to top button