जामखेड; पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात शुक्रवारी दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात वीज कोसळण्याच्या तीन घटना घडल्या. दिघोळ येथे वीज कोसळून भीमराव बाजीराव दगडे (वय 65) या शेतकर्याचा मृत्यू झाला. सरपंच नानासाहेब गिते यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी जाऊन दगडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणला.
दरम्यान, मुंजेवाडी येथे वीज पडून दशरथ शिवाजी लहाने यांच्या दोन बैलांचा व जवळा येथील शेतकरी संतोष मोहन मुळे यांच्या गायीचा मृत्यू झाला. अवकाळी पावसाने शेतकर्यांची धावपळ उडाली आहे. तसेच कांदा पिकाचे नुकसान झाले. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जवळा, मुंजेवाडी व दिघोळ, जायभायवाडी, आनंदवाडी, नान्नज परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेे. जवळा परिसरात झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांची पडझड झाली. झाडे विजेच्या तारांवर पडल्याने काही भागात बत्ती गूल झाली.
नगर शहरात सकाळी 11 वाजता विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सावेडी, भिस्तबाग, एमआयडीसी, तपोवन रस्ता परिसरात चांगलाच पाऊस झाला. सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने नगरकरांची तारांबळ झाली. रस्त्याने जाणार्यांनी दुकाने, मंगल कार्यालयाचा आश्रय घेतला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.
जिल्ह्यात 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, गारपीट व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेने सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वार्यात झाडाखाली उभे राहू नका. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.
विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल यांच्यापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकर्यांनी जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालयाबरोबरच पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.