नगरची भाग्यश्री फंड ठरली ‘महाराष्ट्र केसरी’; चांदीच्या गदेसह चारचाकीची मानकरी | पुढारी

नगरची भाग्यश्री फंड ठरली ‘महाराष्ट्र केसरी’; चांदीच्या गदेसह चारचाकीची मानकरी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगरची भाग्यश्री फंड विरुद्ध कोल्हापूरची अमृता पुजारी यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम लढत झाली. दोघींमध्ये तुल्यबळ अशी लढत झाली. अटीतटीच्या लढत 2-2 अशा समान गुणांवर सुटताना पंचांनी तांत्रिक सरशीच्या जोरावर अहमदनगरची भाग्यश्री फंडला महाराष्ट्र केसरीची विजेती घोषित केले. कोल्हापूरची अमृता पुजारी हिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या भाग्यश्रीला मानाची चांदीची गदा व चारचाकी भेट देण्यात आली. शाहू खासबाग मैदानावर या मॅटवरील कुस्त्यांची रंगत पाहायला मिळाली.

राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात तीन दिवसांपासून महिला महाराष्ट्र कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाला. गुरुवारी सायंकाळनंतर .वेगवेगळ्या गटातील अंतिम सामन्यांना सुरुवात झाली. रात्री साडेआठच्या सुमारास महाराष्ट्र केसरीसाठी 76 किलो वजनी गटात नगरची भाग्यश्री फंड व कोल्हापूरची अमृता पुजारी आमनेसामने आल्या. लढतीच्या सुरुवातीपासून कोल्हापूरच्या अमृताने आक्रमक सुरुवात केली. एकेरी पटाचा तिचा पहिलाच प्रयत्न भाग्यश्रीने परतवून लावला. याचवेळी एकलांगी डाव टाकत भाग्यश्रीने 2 गुणांची कमाई केली.

पहिल्या राऊंडच्या अखेरीस अमृतानेही एक गुण मिळवल्याने 2 – 1 असा फरक राहिला. दुसर्‍या राऊंडला भाग्यश्री व अमृता दोघीही थोड्या थकल्याने खडाखडी सुरू होती. भाग्यश्रीच्या बचावात्मक खेळीमुळे अमृताला 1 गुण बहाल केल्याने सामना 2-2 असा गुणांवर आला. अखेरच्या 30 सेकंदात भाग्यश्रीने अधिक आक्रमकपणे लढत दिली. वेळ संपल्याने पंचांनी तांत्रिक सरशीच्या जोरावर भाग्यश्री फंड हिला विजयी घोषित केले.

संबंधित बातम्या

महाराष्ट्र केसरी विजेती भाग्यश्री फंड हिला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते चांदीची गदा व चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आयोजक अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, पैलवान रवींद्र पाटील, योगेश दोडके यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते.

Back to top button