राजकारणाचा स्तर खालावल्याने आमचीच आम्हाला लाज वाटते: सध्याच्या परिस्थितीवर बाळासाहेब थोरातांचे भाष्य | पुढारी

राजकारणाचा स्तर खालावल्याने आमचीच आम्हाला लाज वाटते: सध्याच्या परिस्थितीवर बाळासाहेब थोरातांचे भाष्य

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचे सोडून आम्ही राजकारणी नेते वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत बसतो, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळेच सद्यस्थितीला राज्यातील राजकारणाचा स्तर इतका खालावत चालला आहे की, अक्षरशः आम्हालाच आमची लाज वाटायला लागली असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने जनतानगर येथील मतदान केंद्रावर बाळासाहेब थोरात हे आले होते. त्यांच्या समवेत आजी आमदार सुधीर तांबे व इतर कार्यकर्ते होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात विचारले असता थोरात म्हणाले की, राज्यात आणि देशांमध्ये जनतेचे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांना मदत करणे आणि त्यांना पुन्हा उभे करणे महत्वाचे आहे. तसेच महागाई व बेरोजगारी देखील वाढली आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी आम्ही राजकारणी दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा करत बसतो, हे राज्याचे दुर्दैव आहे. सध्या राजकारणी ज्या भाषेत बोलतात हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. हा विचार आमच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, बऱ्याच कालखंडानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका पक्षीय नसल्या तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र येऊन बाजार समितीच्या निवडणूका लढवत आहोत. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कम उभी आहे. पुढील एक ते दीड वर्ष हा कालावधी सर्व निवडणुकांचा राहणार आहे. या कार्यकाळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये अटीतटीची लढाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आश्वासने दिली पण पूर्ण करणे तितकेच गरजेचे

आंदोलनकर्त्यांना केवळ आश्वासन देऊन भागत नाही. तर त्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीसुद्धा होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, आंदोलन सुरू झाली की प्रत्येकाचीच पळापळ सूरू होते. मंत्री येऊन भेटतात आणि आश्वासन दिले जाते. हे कायम होत असते. परंतु, दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी किसान सभेच्या लॉन्ग मार्चबाबत केले.

Back to top button