शिर्डीच्या विकासकामांसाठी 82 कोटी मंजूर | पुढारी

शिर्डीच्या विकासकामांसाठी 82 कोटी मंजूर

शिर्डी(नगर); पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथील विकासकामांसाठी नगरपंचायतीला 82 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. श्री साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिर्डी शहरास स्वच्छ व मुबलक पिण्याचा पाणीपुरवठा करणे, शिर्डी शहरातील 100 टक्के सांडपाणी संकलन व प्रक्रिया करणे व शिर्डी शहर हद्दीतील नाल्यांचे पुनर्जिवीकीकरण करण्याचे प्रकल्प मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूचनेनुसार शासनास मंजुरीकरीता सादर करण्यात आलेले होते. सदर प्रकल्पांना मंत्री विखे व खा. डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून मंजुरी प्राप्त झालेली आहे.

केंद्रशासनाच्या अमृत अभियानअंतर्गत शिर्डी शहर वाढीव पाणीपुरवठा योजना किंमत 32.82 कोटी, शिर्डी शहर भूमीगत गटर योजना टप्पा क्र.2 किंमत 45.44 कोटी व पुनमनगर नाला पुनर्जिवीकीकरण करणे किंमत 2.87 कोटी अशाप्रकारे एकूण रक्कम रु.81.13 कोटी किमतीच्या विकास कामांकरीता शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे.

अमृत 2.0 अंतर्गत पुनमनगर नाला पुनर्जिवीकीकरण करणेच्या कामास मंजुरी मिळाली असून शिर्डी शहर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजनांचे राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समीतीसमोर सादरीकरण झाले असून समितीने दोन्ही प्रकल्पास तत्वत: मान्यता दिलेली आहे. याबाबतचे शासन निर्णय लवकरच निर्गमीत होतील.

शिर्डी नगरपरिषदेच्या इतिहासात एकाच आर्थिक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होणार आहे. तसेच शिर्डी शहरातील नव्याने विकसित होणार्‍या उपनगरातील पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची समस्या दूर होणार आहेत. याशिवाय पुनमनगर नाला पुर्नजिवीकीकरण या प्रकल्पा अंतर्गत शहरातील भूगर्भातील पाण्याची पातळीमध्ये वाढ होऊन येथील नागरिकांना फिरण्यासाठी जागा उपलब्ध होणार असून सदर नाल्याचा कायापालट होणार आहे.

शिर्डी शहरातील नागरीकांना मूलभूत सुविधा पुरविणेची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. शिर्डी शहर वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरातील सर्व भागांमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा करणेकामी पाणीपुरवठा वितरण वाहिन्या टाकणे, नळ कनेक्शनची व्याप्ती वाढविणे, नांदुर्खी साठवण तलावास जिओ मेमरन शिट टाकणे, मोठेबाबा मंदिराजवळ उंच पाण्याची टाकी क्षमता 5 लक्ष लीटर बांधकाम करणे चा समावेश आहे.

तसेच भुमीगत गटर योजना टप्पा क्र.2 अंतर्गत संकलन वाहीन्या टाकणे, तृतीय स्तर शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, शहरानजीकच्या चारी क्र.10,11,12 व 13 चा-या बारामाही सिंचन करणे, सौर ऊर्जा प्रकल्प क्षमता 0.5 मेगावॅट चा समावेश या येाजनेत आहे. याशिवाय भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणेचा मानस नगरपरिषदेसमोर होता याकरीता पुनमनगर येथील नाल्याचे गाळ काढणे, क्षमता वाढविणे व सुशोभीकरण करणे च्या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे. मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली या सर्व योजनांचे कामे सुरु करुन गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

Back to top button