राहुरी : रस्त्याच्या कारणावरून एकास कोयत्याने मारहाण | पुढारी

राहुरी : रस्त्याच्या कारणावरून एकास कोयत्याने मारहाण

राहुरी(नगर); पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या कारणावरून तिघा जणांनी मिळून एकाला कोयता, लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली. राहुल नबाजी माने (वय – 33, रा. बाभूळगाव, माने वस्ती, ता. राहुरी) हा त्याच्या कुटुंबासह राहतो. त्यांच्या शेजारी देवराम धर्मा वाघमोडे हा त्याच्या कुटुंबासह राहतो. माने व वाघमोडे या दोघांच्या शेतीच्या बांदामधून जुना वहीवाटीचा रस्ता आहे. वाघमोडे हे माने यांना रस्त्यावरुन जाण्या येण्यास नेहमी अडथळा करतात. या कारणावरुन दोघांमध्ये या पूर्वी देखील वाद झालेले आहे.

दि. 23 एप्रिल रोजी सायं. 7 वा. चे सुमारास राहुल माने व त्याचा चुलत भाऊ बाभूळगावकडे जात असताना शेतीच्या बांदामधील रोडवर दगड ठेवलेले होते. तेव्हा माने हे ते दगड बाजूला करत असताना तेथे आरोपी आले आणि म्हणाले की, ‘तू दगड बाजूला का केले. हा रस्ता आमचा आहे’. असे म्हणून शिवीगाळ करू लागले. तेव्हा राहुल माने त्यांना म्हणाला की, ‘हा जुना रोड आहे.

गावात जाण्यासाठी हा एकच रोड आहे’. असे म्हणाल्याचा राग येऊन देवराम धर्मा वाघमोडे याने ऊस तोडीचा कोयता मारून दुखापत केली. तसेच लाकडी काठीने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर परत या रोडने जाताना दिसले तर येथेच गाडुन टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली.घटनेनंतर राहुल नबाजी माने याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी देवराम धर्मा वाघमोडे, रामेश्वर देवराम वाघमोडे, या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button