कर्जत : महिला सफाई कामगारांचे काम बंद | पुढारी

कर्जत : महिला सफाई कामगारांचे काम बंद

कर्जत(नगर); पुढारी वृत्तसेवा : नगरसेवकांकडून अपमानास्पद वागणूक व थकित पगारासाठी कर्जत नगरपंचायतीच्या महिला सफाई कामगारांनी कालपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून, दोन मे रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात नगरपंचायतीचे अधिकारी रवींद्र साठे यांना महिला सफाई कामगारांनी निवेदन दिले आहे.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, प्रा. विक्रम कांबळे, संगीता भैलुमे, सुलन भैलुमे, कांताबाई पवार, विमल आखाडे,लीलाबाई कांबळे, सीमा पवार, उषा भैलुमे, रेखा आल्हाट, शिल्पा भैलुमे, रेखा ठोसर, सुवर्णा कांबळे, सुभद्रा ओहोळ, सविता नामदास यांच्यासह महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.

निवेदनात म्हटले की, आम्ही महिला सफाई कामगार अनेक वर्षांपासून शहरात सफाई करीत आहोत. काही नगरसेवक अपमानास्पद वागणूक देत आहेत. महिला, पुरुष मुकादम असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे महिला सफाई कामगारांमध्ये पुरुष कामगारांचा समावेश नसावा. तत्काळ महिला मुकादम द्यावा, तसेच मुख्याधिकारी लांडगे यांनी थकीत पगार घेऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही पगार मिळाला नाही. पाणीपुरवठा कर्मचारी करण ओहळ यांचाही आठ महिन्यांपासून पगार झालेला नाही. यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेऊ, असे यावेळी महिला आंदोलकांनी सांगितले.

Back to top button