बाजार समिती निवडणुक : पाथर्डीमध्ये सात केंद्रांवर आज मतदान | पुढारी

बाजार समिती निवडणुक : पाथर्डीमध्ये सात केंद्रांवर आज मतदान

पाथर्डी तालुका(नगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि.28) श्री विवेकानंद विद्यामंदिर शाळेत मतदान होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील खर्डे यांनी 47 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान घेतले जाणार असून, याची मतमोजणी शनिवारी पार पडली जाणार आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये सेवा सोसायटी मतदार संघात 11 जागा असून, त्यात सर्वसाधारणसाठी 7 जागा, महिला राखीव 2, इतर मागास वर्ग 1, भटक्या विमुक्त जाती-जमाती 1 जागा आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात 4 जागा असून, त्यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती-जमाती 1, आर्थिक दुर्बल घटक 1 जागा आहे. व्यापारी-आडते मतदारसंघात 2 व हमाल- मापडी 1 जागा आहे. सेवा सोसायटी मतदारसंघात 1053, ग्रामपंचायत मतदारसंघात 968, व्यापारी -आडते मतदारसंघात 435, तर हमाल-मापाडी मतदारसंघात 111 मतदार आहेत.

पाथर्डी बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळ, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडी प्रणित जगदंबा महाविकास आघाडीचे पॅनल समोरासमोर आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून आकाश वारे हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत कोणता पॅनल बाजी मारतो, हे शनिवारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Back to top button