पारनेरला 3130 मतदार बजावणार हक्क | पुढारी

पारनेरला 3130 मतदार बजावणार हक्क

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि. 28) मतदान होत आहे. त्यासाठी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केंद्र करण्यात आले आहे. सोसायटी मतदारसंघाच्या 11 जागांसाठी 1 हजार 340 मतदार आहेत. ग्रामपंचायतीच्या 4 जागांसाठी 1 हजार 52 मतदार आहेत. व्यापारी 2 जागांसाठी 576 मतदार आहेत, तर हमाल मापाडी 1 जागेसाठी 162 मतदार आहेत.अशा 18 जागांसाठी 3 हजार 130 मतदार आहेत.

पारनेर तालुक्यातील सर्व गावात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार असून, या सर्वांना पारनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापाडी मतदारसंघ निहाय 10 मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. यात 1 ते 4 केंद्रात सोसायटी 5 ते 7 मध्ये ग्रामपंचायत 8 ते 9 व्यापारी 10 मध्ये हमाल मापाडी असे मतदान केंद्रे उभारली आहेत.

मतदान केंद्र अध्यक्षांसह मतदान अधिकार्‍यांच्या नियुक्ती केल्या असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दि. 29 रोजी पारनेर येथील लक्ष्मीनारायण कार्यालयात सकाळी 9 वाजेपासून होणार आहे. आमदार लंके व माजी आमदार विजय औटी एकत्र आल्याने या निवडणुकीसाठी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button