राहुरीत वादळी पावसाचा हाहाकार; वीज झाली गुल | पुढारी

राहुरीत वादळी पावसाचा हाहाकार; वीज झाली गुल

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळी वार्‍यासह धो- धो बरसणार्‍या पावसामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. झाडे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांसह व्यापार्‍यांचे नुकसान झाले. वीज रोहित्राचे खांब कोसळल्याने सर्वत्र काळोख पसरला. राहुरी शहरासह ग्रामिण पट्यामध्ये बुधवारी सायंकाळच्या सत्रात अवकाळी पावसाचे आगमन झाले. दिवसभर आग ओकणार्‍या सुर्यावर अचानकपणे ढग दाटले होते. ऊन कमी झालेले असतानाच जोरदार वारे वाहू लागले.

त्यानंतर पावसाचा कहर सुरू झाला. वादळी वारा व पावसाचा मारा होत असताना मोठ मोठी झाडे अक्षरश रस्त्यावर लोळू लागली. अनेक दुकानांमधील सामान रस्त्यावर आले. शहरासह ग्रामिण भागामध्ये दुकानांच्या पाट्या व फ्लेक्स हवेत उडताना दिसले. ग्रामिण भागातील रस्त्यांवर झाड कोसळल्याने रस्त्यांवरील प्रवास काही काळासाठी थांबला होता. वीज रोहित्राचेही मोठे नुकसान झाले.

बहुतेक वीज रोहित्राचे नुकसान झाल्यानंतर वीजेच्या ताराही रस्त्यावर कोसळल्या. परिणामी महावितरण विभागाने तत्काळ वीज पुरवठा ठप्प केला. सर्वत्रच वीज तारा लोंबकळत असल्याने अंधारमय परिस्स्थिती निर्माण झाली. रात्रभर वीज पुरवठा ठप्प राहिल ,अशी माहिती महावितरण विभागाकडून मिळाली. शहरामध्ये अंतर्गत रस्त्यावरून नदी वाहत असताना व्यापार्‍यांचे वार्‍याने मोठे नुकसान केले.
अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य व्यापार्‍यांचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

Back to top button