कर्जत-जामखेड एमआयडीसीला गती द्या; आ. पवारांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट | पुढारी

कर्जत-जामखेड एमआयडीसीला गती द्या; आ. पवारांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

जामखेड-कर्जत; पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीबाबत कायदेशीर बाबींना गती मिळावी आणि अधिसूचना जाहीर व्हावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी आमदार पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिल्याच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सर्वेक्षण करण्यात आले आणि दोन्ही तालुक्यांना मध्यवर्ती ठरणारी मोठी एमआयडीसी मिळावी, या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भूनिवड समितीने पाहणी करून जागेचे ड्रोन सर्वेक्षण केले होते, 143 व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने मान्यताही दिली होती. त्यानंतर या क्षेत्राची अधिसूचना झाली नाही, ही बाब गेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आमदार पवार यांनी उपस्थित केली होती.

त्या वेळी मंत्र्यांनी अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत अधिसूचना निर्गमित करून जानेवारीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कर्जत येथील औद्योगिक क्षेत्रात शासनाच्या मध्यस्थीने उद्योग आणले जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही त्यावर कोणती ठोस कार्यवाही झाली नाही. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याकडे आमदार पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. हीच बाब आता पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये औद्योगिक वसाहतीच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली.

हा निर्णय थांबवण्यामागे नेमके कोण : आ. पवार
उच्चस्तरीय समितीने औद्योगिक वसाहतीसाठी परवानगी दिली असताना अंतिम मंजुरी मंत्री देत नसतील तर हा निर्णय थांबवण्यामागे नेमके कोण? असा सवाल पवार यांनी केला. याबाबत सावंत यांनी लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आमदार पवार यांनी व्यक्त केली.

Back to top button