कर्जत : फसवणूक करणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : आमदार रोहित पवार | पुढारी

कर्जत : फसवणूक करणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : आमदार रोहित पवार

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : राजकीय स्वार्थासाठी पक्षनेतृत्त्व व कार्यकर्त्यांना फसविणार्‍यांना कर्जत तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन बैठका घेत आहेत. तालुक्यातील शिंदे गावात त्यांनी मतदार व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत केवळ स्वार्थ पाहणारे पक्ष सोडून गेले, हे बरेच झाले. त्यामुळे पक्षाचा श्वास मोकळा झाला आहे. पक्षाने अनेक वर्षे तालुकाध्यक्षपद दिले, मी आमदार झाल्यानंतर पद कायम ठेवले. जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यानंतर बिनविरोध संचालक केले. पक्षाने सर्व पदे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिली. मात्र, त्या बदल्यात त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठा आर्थिक फायदा करून घेतला.

ज्यांच्या जीवावर संचालक झाले, त्या सेवा संस्थेच्या सभासदांना आणि सर्व संचालकांना वार्‍यावर सोडून दिले. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीमध्ये गद्दारी करून मिळालेल्या पैशाचा आता निवडणुकीसाठी वापर करीत आहे. असे लोका पक्ष सोडून गेले म्हणून अजिबात दुःख होत नाही. पक्ष नेतृत्वाचाच नव्हे तर तुमचा विश्वासघात केला आहे. स्वार्थी लोकांना निवडणुकीत हिशेब मागण्याची वेळ आली आहे. त्यांना वेळीच जागा दाखवली नाही, तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा आमदार पवार यांनी दिला.

आमदार पवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांची संस्था आहे, इतर संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल समितीत होत आहे, मग आपलीच संस्था एवढी छोटी का राहिली. याची जबाबदारी विरोधकांची आहे, ही संस्था मोठी झाली असती, तर त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला असता.

परंतु टक्केवारीचा राजकारणात गुंतलेल्यांना शेतकर्‍यांचा फायदा कसा समजणार? यामुळे आता शेतकर्‍यांची हित डोळ्यासमोर ठेवून ही संस्था मोठी करण्यासाठी, शेतकर्‍यांना जास्तीत जास्त शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी, चांगल्या विचारांची माणसं संस्थेवर पाठवण्याची गरज आहे. मी शब्द देतो की, कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत तालुका बाजार समितीत शेतकर्‍यांच्या हिताची कारभार केला जाईल. निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button