नगर : बाजार समित्यांमध्येही विखे-थोरात संघर्ष..! सत्ताबदलानंतर प्रथमच भाजप-महाविकास आघाडी आमनेसामने | पुढारी

नगर : बाजार समित्यांमध्येही विखे-थोरात संघर्ष..! सत्ताबदलानंतर प्रथमच भाजप-महाविकास आघाडी आमनेसामने

गोरक्ष शेजुळ

नगर : राज्यातील सत्ता बदलानंतर प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-शिवसेना विरोधात महाविकास आघाडी असा सत्तासंघर्ष रंगात आला आहे. नगर जिल्ह्यात 14 बाजार समित्यांवरील वर्चस्वासाठी भाजप नेते महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आघाडीचे नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दंड थोपटले आहेत.

अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, नगर, कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी या नऊ विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचाच वरचष्मा आहे. तर शिर्डी, पाथर्डी व श्रीगोंदा या तीन ठिकाणी भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकांवरही याचा कुठे ना कुठे प्रभाव पहायला मिळणार आहे.

राजकीय समीकरण; विजयाचे गणित

पारनेरमध्ये आमदार नीलेश लंके व विजय औटी हे कट्टर विरोधक एका मंचावर आले आहेत. कर्जतमध्ये आमदार रोहित पवार विरोधात आमदार राम शिंदे यांच्या गटातच लढत आहे. येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिरे हेदेखील शिंदेंसोबत आल्याचे दिसले. जामखेडमध्ये मात्र जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी शेवटच्या क्षणी आमदार रोहित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेंची अडचण वाढल्याचे बोलले जाते.

नगरमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. कर्डिले यांच्या पॅनलला खासदार सुजय विखेंची रसद मिळाल्याने निवडणूक निर्णायक वळणावर पोहचली आहे. कर्डिले विरोधात शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, प्रताप शेळके यांनी उर्वरित 16 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. मविआला आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार नीलेश लंके यांची रसद मिळाल्याने चुरस वाढली आहे.

शेवगावमध्ये राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुलेंच्या विरोधात भाजप आमदार मोनिका राजळेंना काँग्रेस आणि मनसेही साथ दिल्याचे चित्र आहे. पाथर्डीत आमदार मोनिका राजळे विरोधात प्रताप ढाकणे असाच थेट सामना आहे. जिल्हा बँकेची परतफेड म्हणून या ठिकाणी घुले खास लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे. नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख विरोधात बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे गटात लढत रंगली आहे. गडाखांची हमाल मापाडीची एक जागा बिनविरोध झाली आहे.

श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप यांच्या विरोधात आमदार बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे एकत्र आहेत. जगताप गटाकडून साजन पाचपुते व मितेश नाहाटा यांची उमेदवारी लक्षवेधी ठरणारी आहे. राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विरोधात शिवाजी कर्डिले यांच्या गटात लढत आहे. मात्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही निवडणूक हातात घेतल्याने चुरस वाढल्याचे दिसून येते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर श्रीरामपुरात माजी आमदार भानुदास मुरकुटे, करण ससाणे हे एकत्र आलेले आहेत; तर आमदार लहू कानडे आणि अविनाश आदिक यांनी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन चुरस कायम ठेवली आहे. राहाता हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे होमग्राऊंड असले तरी तेथे यावेळी बिनविरोधची परंपरा खंडित झाली आहे. असे असले तरी निवडणुकीपूर्वीच विखे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

उर्वरित 15 जागांसाठी विखे-थोरात संघर्ष दिसणार आहे. अकोल्यात विद्यमान आमदार किरण लहामटे यांचा पॅनल लंगडा झाल्याने माजी आमदार वैभव पिचड यांच्या तीन जागा बिनविरोध आल्या आहेत. संगमनेरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात पॅनल उभा आहे.

कोपरगावात आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे समर्थक एकत्र आले आहेत. येथे तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. एकूणच, जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकांतील यश-अपयश हे भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे, तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याभोवतीच फिरणारे आहे. त्यामुळे ‘विखे-थोरात’ यांच्या संघर्षाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

मतदान आणि मतमोजणी कधी

बा.समिती मतदान मतमोजणी
नगर 28 एप्रिल 29 एप्रिल
राहुरी 28 एप्रिल लगेचच
संगमनेर 28 एप्रिल 29 एप्रिल
पाथर्डी 28 एप्रिल 29 एप्रिल
कर्जत 28 एप्रिल 29 एप्रिल
श्रीगोंदा 28 एप्रिल 29 एप्रिल
पारनेर 28 एप्रिल 29 एप्रिल
बा.समिती मतदान मतमोजणी
अकोले 30 एप्रिल लगेचच
कोपरगाव 30 एप्रिल लगेचच
श्रीरामपूर 30 एप्रिल लगेचच
शेवगाव 30 एप्रिल लगेचच
राहाता 30 एप्रिल लगेचच
नेवासा 30 एप्रिल लगेचच
जामखेड 30 एप्रिल लगेचच

मतदारांची पळवापळवी अन् लक्ष्मीदर्शन?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीची निवडणूक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी घोडेबाजार सुरू झाला आहे. मतदारांची पळवापळवीही पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा, नगर, राहुरीत एका मतदारांच्या लक्ष्मीदर्शनाची चर्चा जोरात आहे. सत्तासंघर्षात मतदारांना चांगलाच ‘भाव’ आला असल्याचे चित्र आहे.

Back to top button