श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव नागवडे (बापू) यांनी चाळीस वर्षे तपश्चर्या करून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी कधीही तडजोड केली नाही. त्याच नागवडे घराण्याच्या वारसदारांनी पाचपुते यांच्याशी बाजार समिती निवडणुकीत युती करून बापूंची चाळीस वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळवली, असा घणाघाती आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केला.
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर निशाणा साधला.
शेलार म्हणाले, की देशात काँगेस आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. भाजपच्या टोकाच्या भूमिकेमुळे काँगेसचे नेते राहुल गांधी यांना दिल्ली येथील बंगला सोडावा लागला. इथे मात्र काँगेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपशी युती करून काँग्रेसच्या ध्येयधोरणांना मूठमाती दिली आहे. नागवडे कुटुंबीय उद्याच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत ते नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
बाजार समितीसारख्या निवडणुका भाजपला सोबत घेऊन कराव्या लागत असतील तर त्यांना आमदारकी कशी मिळेल, अशी मिश्किल टिप्पणी शेलार यांनी केली. आम्ही आमच्या पॅनेलमध्ये स्व. शिवाजीराव नागवडे यांचे विचारांना मानणार्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पॅनलमध्ये बापूंच्या विचारांना मानणारे किती उमेदवार आहेत, हे त्यांनी एकदा सांगावे. आम्ही बापूंच्या वारसदारांना उमेदवारी दिल्याने आम्हाला नागवडे गटाचे मतदान मिळेल.
श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत काँगेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजपशी युती करून मोठी क्रांती केली. त्यांनी छापलेल्या बॅनरवर आमदार थोरात यांचा फोटो का छापला नाही? असा सवाल शेलार यांनी केला.
शेलार म्हणाले, पाचपुते-नागवडे एकत्र लढत आहेत अन् त्याचवेळी नागवडे कारखान्याच्या पोटनिवडणुकीत पाचपुते यांचे विश्वासू संदीप नागवडे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी तुम्ही कसोशीने प्रयत्न करता. हाच का तुमचा आघाडीचा धर्म. तुम्ही आता एकत्र आहात तर संदीप नागवडे यांची बिनविरोध निवड करा.
बाजार समिती अगर इतर निवडणुका असतील यामध्ये आम्ही काय करावे, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आमचे वकीलपत्र घेऊ नये, असा टोला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आण्णासाहेब शेलारांना मारला. शेलार मानधनावर काम करणारे आहेत. त्यांनी काहीही बोलावे, आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही, असेही नागवडे यांनी आवर्जून सांगितले.