कोळपेवाडी : 11 गावांतील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. आशुतोष काळे | पुढारी

कोळपेवाडी : 11 गावांतील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या अकरा गावांमध्ये विधानसभा निवडणुकीत जरी मताधिक्य कमी मिळाले असले, तरी कोपरगाव तालुक्यातील इतर गावांप्रमाणे अकरा गावांना देखील निधी दिला आहे. केलेल्या विकास कामांतून हे मताधिक्य नक्की वाढणार आहे, याचा मला विश्वास आहे.

त्यामुळे यापुढील काळातही विकासकामांना निधी कमी पडू न देता अकरा गावातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी चितळी येथे एका कार्यक्रमात दिली. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चितळी येथे राहाता- चितळी रोड ते प्रसाद साळवे घर रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमीपुजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

आ. काळे पुढे म्हणाले की, अकरा गावातील नागरिकांची रस्त्यांची मागणी होती. त्या मागणीनुसार अनेक रस्त्यांसाठी निधी दिला आहे. सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करून त्यांना निधी देखील मंजूर झाला आहे. मात्र बहुतांश रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. काही कामांची स्थगिती उठली असली तरी सर्वच कामांची स्थगिती उठवावी, यासाठी न्यायालयात गेलो असून न्यायालयाचा निकाल सकारात्मक येईल व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन देखील अकरा गावातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल व निकष निश्चित झाल्यानंतर निधी उपलब्ध होऊन नुकसान भरपाई मिळेल. एका गावात हवामान केंद्र असल्यामुळे त्या गावात पाऊस झाला नाही व शेजारच्या गावात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले तरी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात हवामान केंद्र व्हावे, अशी मागणी केली आहे. हवामान केंद्र संख्या वाढल्यास नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांना भरपाई मिळेल असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, सोपानकाका वाघ, सुरेश वाघ, दिपक वाघ, रेवणनाथ वाघ, मछिंद्र वाघ, दिलीपराव चौधरी, बाळासाहेब चौधरी, मच्छिंद्र चौधरी, शंकरनाना चौधरी, बाबासाहेब वाघ, रुपेश गायकवाड, मेजर प्रसाद साळवे, राजेंद्र चौधरी, तोफीक कुरेशी, दिनेश जगताप, सरपंच शिवाजी साबदे, संपतकाका वाघ उपस्थित होते.

एकाच वेळी सर्व लाभधारक शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी गोदावरी कालव्यांची वाहन क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यासाठी माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 300 कोटी निधीस मंजुरी मिळविली असून दरवर्षी मिळणार्‍या 100 कोटी निधीतून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकर्‍यांच्या थकीत पाणी पट्टी रक्कमेला लावण्यात आलेले दंड व व्याज माफ करण्यात येऊन वीज बिलाप्रमाणे टप्याटप्याने भरण्यास सवलत द्यावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

                                                  – आ. आशुतोष काळे

Back to top button