नगर : स्पर्धा परीक्षा केंद्र होणार डिजिटल | पुढारी

नगर : स्पर्धा परीक्षा केंद्र होणार डिजिटल

नगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राने अनेक अधिकारी घडविले. पण गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षा केंद्र बंद आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी 55 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने स्पर्धा परीक्षा केंद्राला झळाळी मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धा परीक्षा केंद्र अद्ययावत ग्रंथालयासह डिजिटल होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून चांगल्या संस्थेची चाचपणी सुरू आहे.

गरीब, हुशार विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतून चांगले करिअर घडावे, यासाठी 5 एप्रिल 2007 मध्ये महापालिकेने प्रोफेसर कॉलनी चौकात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली.तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करण्यात आला होता. या केंद्राच्या इमारतीला स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र असे नाव देण्यात आले. स्व. प्रा. एन. बी. मिसाळ यांनी प्रकल्पाचे संचालक म्हणून 11 वर्षे काम पाहिले.

हा उपक्रम राबविणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका होती. कोरोना काळात केंद्र बंद पडले आणि तेथून स्पर्धा परीक्षा केंद्राला उतरती कळा लागली. कोविड काळातच महापालिकेचा पदभार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असताना त्यांनी खासगी तत्त्वावर केंद्र चालविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तोही नंतर रेंगाळला. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या.

महापालिका बाह्य संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र चालविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी संस्थेची शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या इमारतीत सध्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोविड लसीकरण व अन्य लसीकरण विभाग सुरू आहे. इमारतीला अवकळा आलेली आहे. त्यात आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजनमधून 55 लाख रुपयांचा निधी स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी दिला आहे. त्यातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे नूतनीकरणच होणार आहे. अद्ययावत ग्रंथालय व डिजिटल स्पर्धा परीक्षा केंद्र करण्याचा मानस अधिकार्‍यांचा आहे.

घडले अधिकारी
महापालिकेने 2007 मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केल्यानंतर अनेक गरीब होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. आतापर्यंत अनेक जण उच्च पदस्थ अधिकारी झाले आहे. केंद्र सुरू झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे.

स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी निधी दिल्याची माहिती मिळाली. त्या निधीतून स्पर्धा परीक्षा केंद्रात अद्ययावत ग्रंथालय व संगणकीकृत केंद्र करण्याचा मानस आहे. लवकरच त्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.

                                        – डॉ. पंकज जावळे, आयुक्त, महापालिका

नगर शहरात अत्यंत हुशार मुले आहेत. मात्र, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली येथे जावे लागत आहे. तिथे लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे नगर शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झाल्यास गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नगरमध्येच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येईल.

                                                – सत्यजित तांबे, आमदार

Back to top button