नगर: दोन सोनसाखळी चोर गजाआड, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांचा शोध सुरू | पुढारी

नगर: दोन सोनसाखळी चोर गजाआड, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांचा शोध सुरू

नगर, पुढारी वृत्तसेवा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात श्रीरामपूर येथून दोघांना गजाआड केले. त्यांच्याकडून सुमारे चार लाख 31 हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे सोने जप्त केले. अन्य दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. प्रफुल्ल अशोक जाधव (वय 24, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर), विष्णू दत्तात्रेय गवारे (वय 25, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी राधिकाबाई शंकर दंडवते (वय 85, रा. दंडवते चाळ, सावेडी, नगर) 30 मार्च रोजी पायी घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार हिसकावून नेला. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, की आरोपी कुणाल जाधव व मनोज जामदार यांनी नगर व श्रीरामपूर परिसरात चोरलेले दागिने प्रफुल्ल जाधव व विष्णू गवारे यांच्याकडे असून ते विक्रीसाठी अशोकनगर येथून श्रीरामपूरला येणार आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने निपाणी फाटा, अशोकनगर येथे सापळा लावला. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना थांबवून झडती घेतली असता सोन्याचे दागिने मिळाले. नगर व श्रीरामपूर येथील सोन्याचे दागिने विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दागिने व दुचाकी जप्त केली व आरोपींनी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर केले. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर, मनोहर गोसावी, पोलिस नाईक विजय ठोंबरे, सचिन आडबल, शंकर चौधरी, पोलिस नाईक शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, आकाश काळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तोफखाना, कोतवाली, श्रीरामपूर शहर, राहुरी, छत्रपती संभाजीनगर या पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यात चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

Back to top button