नगर: उसनवारी बुडविण्यासाठी लुटीचा बनाव, फिर्यादीच निघाला आरोपी; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या | पुढारी

नगर: उसनवारी बुडविण्यासाठी लुटीचा बनाव, फिर्यादीच निघाला आरोपी; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

नगर/नेवासा, पुढारी वृत्तसेवा: टाकळीभान ते पाचेगाव (ता. नेवासा) रस्त्यावर दुचाकी अडवून एकाला लुटल्याचा गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास केला आणि त्यात फिर्यादीच आरोपी निघाला. फिर्यादीने लोकांकडून घेतलेले उसने पैसे बुडविण्यासाठी लुटीचा बनाव केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून नेवासे पोलिसांत हजर केले.

संदीप गणपतराव फुगे (वय 38, रा. पाचेगाव शिवार, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे. संदीपने लुटीबाबत दिलेल्या फिर्याद दिली होती. गृहकर्जापोटी मंजूर झालेली सात लाख रुपयांची रक्कम टाकळीभान येथील बँकेतून काढून ती कापडी पिशवीत ठेवली. पिशवी दुचाकीच्या हँडेलला अडकवून टाकळीभान ते पाचेगाव रस्त्याने घरी जात असताना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून रोकड हिसकावून नेली, असा त्या फिर्यादीचा आशय होता. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना फिर्यादी संदीप फुगे पोलिसांना विसंगत माहिती देऊ लागला. त्यामुळे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी फिर्यादीत नोंदविलेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुगे याने वापरलेल्या दुचाकीची सखोल चौकशी केली असता पोलिसांना शंका आली. त्यांनी फुगे याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने लुटीचा गुन्हा घडलाच नसल्याचे सांगितले. ‘मी लोकांकडून उसनवार घेतलेले पैसे बुडविण्यासाठी बँकेतून काढलेली सात लाखांची रक्कम घरी नेऊन ठेवली. त्यानंतर रस्ता लूट झाल्याचा बनाव करून नेवासा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली,’ अशी कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नेवासे पोलिस ठाण्यात हजर केले. त्याच्याकडून सात लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रेय हिंगडे, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, भीमराज खर्से, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली. नेवाशाचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे तपास करीत आहेत.

Back to top button