कुकाणा (नगर), पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाकडून होत असलेली पिळवणूक व अडवणुकी विरोधात नेवासा तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अन्न औषध प्रशासन मंत्री आमदार संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देऊन दिला आहे. नेवासा तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिलीप ढवन यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी नेवासा फाटा येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त आहे.
औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानाच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधनाने होणार्या छोट्यामोठ्या त्रुटीकरता प्रशासनाद्वारे त्यांचे औषध विक्रीचे परवाने काही काळ निलंबित करणे किंवा कायमस्वरूपी रद्द करणे, अशी कारवाई केली जाते.
या त्रुटींसाठी औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जाते. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद कायद्यात असल्याने औषध विक्रेते अपील दाखल करतात. अपीलावर स्थगनादेश देणे अथवा सुनावणी लावून निर्णय देणे अपेक्षित असते. अनेक वेळा शिक्षेचा संपूर्ण कार्यकाळ संपून ही मंत्र्यांच्या कार्यालयाकडून संपर्क साधूनही निर्णय दिला जात नाही. यामुळे अनेक सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागते.
राज्यसरकारने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास राज्य संघटनेस या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल, प्रसंगी बंद ही पुकारावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप ढवण, उपाध्यक्ष महेश खंडागळे, खजिनदार किशोर चुत्तर, जिल्हा कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर दरंदले, सुदर्शन पठाडे, गणेश लंघे, शरद गोल्हार, किशोर खोसे, संदीप नाईक, रमेश सावंत, नीरज मनोच्या, संदेश काळे, नितीन गर्जे, गंगाधर लोखंडे आदी उपस्थित होते.