नगर: श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे पर्यटन स्थळ उभारणार, खासदार सुजय विखे; विविध विकासकामांचे भूमिपूजन | पुढारी

नगर: श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे पर्यटन स्थळ उभारणार, खासदार सुजय विखे; विविध विकासकामांचे भूमिपूजन

करंजी (नगर), पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे नेहमी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून भाविकांसह निसर्गप्रेमींसाठी आकर्षक पर्यटन स्थळ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. सन 2022- 23 या आर्थिक वर्षातील जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेंतर्गत पर्यटन विकास व उद्यानाच्या कामांसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार विखे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा उपसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने, सहायक उपवनसंरक्षक अमोल गरकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, अभय आव्हाड, ज्येष्ठ नेते मुरली पालवे, प्रतिक खेडकर, वन अधिकारी थोरात आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात भरीव विकास निधी दिला जात आहे. जिल्ह्यात विकास कामे सुरू आहेत. त्या दृष्टीने वृद्धेश्वर येथे पर्यटन केंद्रासाठी 40 लाख रुपये मंजूर केले असून, त्या निधीतून निसर्ग पर्यटन केंद्राची दुरुस्ती, तसेच पर्यटकांसाठी मोर, काळवीट, माळढोक, बिबट्या अशा विविध प्राण्यांची प्रतिकृती बसविण्यात येणार आहे. उद्यान परिसरात पर्यावरण विषयक माहिती देणारे फलक लावले जाणार आहेत, विविध फुलझाडी, औषधी वनस्पती, तसेच स्वच्छतागृह, सेल्फी पॉईंट उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी आभार मानले.

Back to top button