संगमनेरच्या सहकारी संस्था मोडण्याचा काहींचा प्रयत्न : आ बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेरच्या सहकारी संस्था मोडण्याचा काहींचा प्रयत्न : आ बाळासाहेब थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : ‘हम से जो टकरायगा मिट्टी मे मिल जायेगा’ आशा घोषणा महसूल मंत्री झाल्यानंतर संगमनेर येथील विजय मिरवणुकीत देण्यात आल्या तेव्हापासून आज तगायत संगमनेरकरांची जिरवायचे काम त्यांनी सुरू केले. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था चांगल्या चालू आहे. त्या कशा मोडतील असा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा यांचे नाव न घेता केला आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ चंदनापुरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी थोरात बोलत होते.

आ. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, कित्येक वर्षानंतर बाजार समितीची निवडणूक त्यांनीच या तालुक्यावर लादली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि या निवडणुकीत त्यांचा संस्था मोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो हाणून पाडा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. यावेळी शिवसेनेची माजी मंत्री आणि शिर्डी लोकसभेचे संपर्कप्रमुख बबन घोलप, माजी आ. डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आ. सत्यजित तांबे, डॉ जयश्री थोरात, प्रतापराव ओहळ, रणजित देशमुख, शंकर खेमनर, आबासाहेब थोरात, अमर कतारी, गीताराम गायकवाड, सुरेश कान्होरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मी ही अनेक वर्ष राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं परंतु कधीच सूडाच्या भावनेतून कुणावरही खोट्या नाट्या केसेस केल्या नाहीत. महसूल विभागात चांगले काम करण्याच्या अनेक संधी आहेत. परंतु ते सोडून देत कार्यकर्त्याला कसा त्रास होईल हेच पाहत आहे. एवढ्या खालच्या थराचे राजकारण आपण कधीच केले नाही. मात्र विद्यमान महसूल मंत्र्यांकडून खालच्या थराचे राजकारण सुरू असल्याचे टीका आ थोरात यांनी विखेंवर केली.

Back to top button