संगमनेर : सामुदायिक विवाह सोहळ्यात 27 जोडपी विवाहबद्ध | पुढारी

संगमनेर : सामुदायिक विवाह सोहळ्यात 27 जोडपी विवाहबद्ध

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : ढोल ताशाच्या गजरात सनई चौघडा आणि मंगलाष्टकाच्या स्वरात अक्षदाच्या शुभ वर्षामध्ये मालपाणी उद्योगसमूहाच्या वतीने मालपाणी लॉन्सवर अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 24 हिंदू धर्मीय तर 3 बौद्ध धर्मीय असे एकूण 27 नववधुवर जोडपे विवाहबद्ध झाले.

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी मालपाणी लॉन्सचा सर्व परिसर आकर्षकरित्या सजविण्यात आला होता. वसुंधरा दिनाचे औचित्य साधत व्यासपीठ हिरव्या रोपांनी सजविण्यात आले होते. व्यासपीठावरती साकारलेली राजस्थानी महालाची सुबक देखणी भव्य प्रतिकृती सर्वांनाच आकर्षित करीत होती तर या सामुदायिक सोहळ्यासाठी आलेल्या वर्‍हाडी मंडळींनी मालपाणी लॉन्स परिसर फुलून गेला होता.

संपूर्ण सोहळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मालपाणी उद्योग समूहाचे व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विभागांच्या 27 समित्यानी यशस्वीरीत्या सांभाळली. त्यामुळे प्रत्येक पाहुणे मंडळींना आपल्या वधू-वरांपर्यंत पोहोचता आले.
मालपाणी उद्योग समूहाच्या सजविलेल्या ट्रॅक्टर मधून सर्व वरांची ढोल-ताशांच्या गजरात सनई चौघडाच्या स्वरात मिरवणूक काढण्यात आली होती.

सुवर्णा मालपाणी आणि ओंकार तिवारी यांनी मधुर स्वरामध्ये मंगलाष्टके उपस्थीतांच्या कौतुकाचा विषय ठरला. नव परिणीत दांपत्यांचा सप्तपदीच्या विधीसाठी हिरवळीवर अनेक होमकुंडे तयार करण्यात आली होती. वधू- वरांचे मामा- मामी यांच्यासाठी व्यासपीठाच्या जवळ विशेष कक्ष तयार करण्यात आला होता.

प्रत्येक दाम्पत्यास लोखंडी कपाट, पलंग भांडी असे एकंदर 25 हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य मालपाणी समूहाच्या वतीने सस्नेह भेट देण्यात आले. या विवाह सोहळ्यास आ. सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, कामगार नेते कॉ. कारभारी उगले, कॉ. माधवरावनेहे, कॉ ऍड. ज्ञानदेव सहाणे, मालपाणीउद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, जय मनीष मालपाणी उपस्थित होते.

..तर कर्जबाजारी कमी होतील
लग्न करण्याच्या चढाओढीच्या पद्धतीमुळे एखाद्याची ऐपत नसली तरी नाईलाजसत्व कर्ज काढून लग्न करावी लागत आहे. मागील काही वर्षात कर्जापोटी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने अगदी साधेपणाने सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा मनाशी निश्चय पक्का केला तर नक्कीच कर्जबाजारीपणातून होणार्‍या आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते, असे रोखठोक मत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केले.

Back to top button