शिर्डीत लवकरच आयटी पार्क उभारणार : मंत्री राधाकृष्ण विखे पा | पुढारी

शिर्डीत लवकरच आयटी पार्क उभारणार : मंत्री राधाकृष्ण विखे पा

राहाता/एकरुखे; पुढारी वृत्तसेवा : सोनेवाडी शिवारात शेती महामंडळाच्या सुमारे पाचशे एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क व आयटी पार्क करण्यात येणार आहे. सावळी विहीर येथे पशु महाविद्यालय व देशातील पहिले पशु विज्ञान केंद्र करण्याचा निर्णय झाला आहे. जवळूनच समृद्धी महामार्ग जात आहे. त्यामुळे या भागाचा विकास तालुक्याचा विकास येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात होऊन मोठा बदल दिसणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

राहाता तालुका प्रेस क्लब व डॉ. मैड स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयोजनातून राहाता येथील प्रीतीसुधाजी स्कूल मध्ये नुकताच ‘मीट द प्रेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तालुक्यातील पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री विखे पाटील यांची प्रगट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक इंद्रभानजी डांगे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संतोष मैड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रेस क्लबच्या वतीने सत्कारमूर्ती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश (काका) कोयटे, हॉटेल गोरडियाचे मॅनेजमेंट डायरेक्टर दीपक निकम, राहाता मंडल अधिकारी मोहसीन या मान्यवरांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी तुषार आहेर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कैलास सदाफळ, बापूसाहेब पानगव्हाणे, स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश डांगे, पुनम डांगे, भगवान डांगे यांच्या शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मिट दी प्रेस’ कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे म्हणाले की, सावळीविहीर ते नगर हा महामार्ग दोन वेळेस दोन ठेकेदार पळून गेल्यामुळे मागील सरकारच्या काळात तो बंद पडला. मात्र आम्हीच रस्ता होऊ देत नाही, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तिरुपती प्रमाणेच या विमानाचा मोठा विस्तार करण्यात येणार असून नवीन टर्मिनल इमारतीसाठी 500 कोटी रुपये मंजूर झाले आहे. नाईट लँडिंग सुरू झाली आहे. येथे एकावेळी बारा विमाने उभे राहण्यासाठी व्यवस्था होणार आहे.

निळवंडे धरणाबाबत ते म्हणाले की, बर्‍याच दिवसाचा रेंगाळलेला निळवंडे धरणाचा व कालव्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागला असून कालव्यांना प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडून या कालव्यांची तपासणी होणार आहे. लवकरच निळवंडेचा डावा, उजवा कालवा सुरू होऊन पाणी मिळणार आहे.

डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी लवकरच राज्यात दोन भूकंप होणार? असे म्हटले होते व अजित पवार यांनी देखील त्यास दुजारासारखे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यात वेगवेगळी मोठी चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना ना. विखे यांनी म्हटले की अजित पवार राज्यालाच नाही, तर खुद्द शरद पवार यांना सुद्धा कन्फ्युज केल्याचे यावेळी विनोदी शैलीत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये कोरोना काळात मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे देशात सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात आली. इतर देशांनाही भारताने लस पुरवली. ही देशाच्या दृष्टीने सरकारच्या दृष्टीने मोठी गोष्ट असून त्याची कार्यकर्त्यांनी अधिकाधिक प्रसिद्ध केली पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यामध्ये वाहनधारकांना पोलिस किंवा कोणत्याही यंत्रणेचा त्रास होणार नाही, अशी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात येतीलच.

लव जिहाद प्रकरणात कोणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही .असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्या खाजगी जीवन क्रमाबद्दल विचारताच त्यांनी विविध विनोदी शैलीमध्ये अनेकदा मोठा पोलिसांचा ताफा बरोबर असताना बाथरूमला रस्त्यावर थांबणेही मोठे कधी कधी मुश्किल होते. कधी कधी रात्री वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहतो. मात्र कधीकधी बातम्या पाहत राहिलं तर झोप उडून जाते. असा टोलाही त्यांनी विनोदी शैलीत मारला.

मनातले मुख्यमंत्री फडणवीसच : विखे
मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असून पक्षाचे म्हणून आम्ही मुख्यमंत्री म्हणूनच त्यांच्याकडे बघतो. मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम सुरू आहे. असे सांगतशिर्डी या तीर्थक्षेत्राचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार असून येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये येथे अत्यंत धार्मिक वातावरण निर्मिती कशी राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा 2700 कोटी रुपयांचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Back to top button