कुकाणा : बैलगाडा शर्यतीत चित्तथरारक लढती

कुकाणा : बैलगाडा शर्यतीत चित्तथरारक लढती

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील बैलगाडा शर्यतीत चित्तथरारक लढतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या लढतीत भेंडा येथील स्वप्निल बोधक यांच्या बैलटांग्याने शेवटची शर्यत जिंकून अकरा हजार रूपये किंमतीची पितळी गदा व 51 हजारांचे रोख बक्षीस पटकावले. भानसहिवरा येथे ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांचे ग्रामदैवत कवीजंग बाबा व तक्या साहेब यांचा उरूस भरविला जातो. हा उरूस म्हणजे या भागातील महिलांना खरेदीसाठी पर्वणीच ठरतो. या उरूसात अनेक व्यावसायिक दुकाने थाटतात. उरूसामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती लक्षणीय असते.

उरूसानिमित्त पंचायत समितीचे माजी सभापती किशोर जोजार यांच्या नियोजनात यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात कावड मिरवणूक, संदल मिरवणूक, छबिना मिरवणूक, ऑर्केस्ट्रा, तमाशा त्याचबरोबर नेवासा तालुक्यासह परिसरातील सर्वात मोठा बैलगाडा शर्यत ठेवण्यात आली होती. या शर्यतीत नगर जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील दोनशेहून आदीक बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदविला.

शर्यतीत अंतिम सामना येवला तालुक्यातील महालखेडा येथील राहुल खांडेकर व नेवासा तालुक्यातील भेंडा येथील स्वप्निल बोधक यांच्या बैलटांग्यांमध्ये झाला. यात भेंडा येथील टाग्यांने बाजी मारली. या टांग्याचे चालक म्हणून डॅनियल मकासरे, किरण निपुंगे, मंगेश गव्हाणे, प्रकाश शिंदे, राहुल गोरे यांचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. परिसरातील पाच हजारांहून अधिक बैलगाडा शौकिनांनी शर्यतीचा आनंद लुटला.

हा यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे ज्ञानेश्वर पवार, दत्तात्रय काळे, गणेश भुजबळ, नंदकुमार जाधव, प्रवीण वंजारे, मदन गुजर, सावळेराम कदम, संतोष मकासरे, बाळासाहेब ढवाण, बाळासाहेब निपुंगे, अनिल टाके, संजय तुपे, संजय गोरे, संदीप तळपे, पवन जाधव, दीपक जाधव, सोनक मकासरे, शिमोन मकासरे, पोपट शेकडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news