नगरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल देऊ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

नगरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल देऊ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगरमधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी त्यास मान्यता देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालिम संघातर्फे वाडिया पॉर्क जिल्हा क्रीडा संकुलात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.

त्या वेळी ते फडणवीस बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव, सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, वसंत लोढा, विक्रम राठोड, माजी नगरसेवक धनंजय जाधव, नाना डोंगरे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की संयोजकांनी चांगली कुस्ती स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा हे नाव यासाठी महत्त्वाचे आहे, की कुस्तीला पहिल्यांदा राजाश्रय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यासाठी बंद भिंतींमधल्या तालमी किल्ल्यांवर बांधल्या. त्याच तालमी पुनरुज्जीवित करण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांनी चांदीच्या गदेची परंपरा सुरू केली होती. येथे आयोजकांनी सोन्याच्या गदेची नवीन परंपरा सुरू केली. ही अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की आज खर्‍या अर्थाने कुस्तीला चांगले दिवस आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आमदार राम शिंदे, अभय आगरकर, वसंत लोढा यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले.

महाराष्ट्राला कुस्तीत ऑलिम्पिकचे पदक मिळावे
पैलवान खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमधील कुस्तीतून पदक महाराष्ट्राला मिळवून दिले. त्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकचे पदक मिळाले नाही. ते आता मिळाले पाहिजे, महाराष्ट्रातील मल्लांना विविध स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

Back to top button