‘त्या’ लाचखोर तलाठ्यास दिली न्यायालयीन कोठडी

‘त्या’ लाचखोर तलाठ्यास दिली न्यायालयीन कोठडी

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : चिखलीगावचे कामगार तलाठी धनसिंग राठोडच्यावतीने खासगी दलालास 36 हजारांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, लाचखोर तलाठ्यालाही ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात बिगर शेतीक्षेत्र असलेल्या एका तक्रारदाराने वडिलांसह अन्य 11 जणांच्या नावे असलेल्या जमिनीचे स्वतंत्र सात- बारा उतारे नोंदवि ण्यासाठी चिखलीचे तलाठी धनराज नरसिंग राठोड याच्याशी संपर्क साधला, परंतु काम करुन देण्याच्या मोबदल्यात तलाठी राठोड याने तक्रारदाराकडून 40 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती 36 हजार रुपये देण्यावर एकमत झाले. तत्पूर्वी तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. नाशिक एसीबीच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, पो. ह. सचिन गोसावी, पो. ना. अजय गरुड व चालक विनोद पवार यांनी संगमनेरात येवून तक्रारदारास लाचखोर तलाठी राठोड याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

यावेळी संबंधित लाचखोराने लाचेची रक्कम घुलेवाडी येथील सह्याद्री मल्टी सर्विसेसचा चालक व तलाठी राठोडचा खासगी दलाल योगेश विठ्ठल काशीद (रा.घुलेवाडीफाटा) याच्याकडे रक्कम देण्यास सांगितले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या हातात विशिष्ट पावडर लावलेल्या नोटा देवून त्यांना संबंधित दलाकडे पाठवले.

लाचेची रक्कम स्वीकारताना वेशांतर करुन दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने झडप घालून दलालास रंगेहात पकडले होते. पोलिसांसमोर काशीदने कोणाच्या सांगण्यावरून घेतली, असे विचारले असता तलाठी राठोड याच्यासाठी घेतल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याने दोघांना ताब्यात घेतले होते.

logo
Pudhari News
pudhari.news