तिसर्‍या आघाडीची जोरदार मोर्चेबांधणी; तिरंगी लढतीमुळे चुरस वाढली | पुढारी

तिसर्‍या आघाडीची जोरदार मोर्चेबांधणी; तिरंगी लढतीमुळे चुरस वाढली

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी चुरशीची होत असून, वेगवेगळ्या माध्यमातून गाजत आहे. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र कोठारी यांच्या नेतृत्वाखाली छोट्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी निर्माण केली आहे.

या आघाडीत रासप शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे. आमदार राम शिंदे यांनी दोन्हीही शिवसेना व विखे गट यांना सोबत घेऊन मजबूत आघाडी तयार केली आहे. तर, आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसला सोबत घेत अर्धवट महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. यामुळे या दोन मातब्बर नेत्यांच्या विरोधात या आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात तिसरा पॅनल उतरविला आहे. यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती देताना रवींद्र कोठारी म्हणाले की, या तिसर्‍या आघाडीमुळे भाजप व मित्र पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याप्रमाणे आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांची विजयाचे गणित बदलणार आहे. तिसर्‍या आघाडीमुळे अनेक नवीन समीकरणे समोर आली आहेत. या संस्थेचे दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे दोन संचालक तिसर्‍या आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. याशिवाय इतरही चांगले उमेदवार असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

संस्थेमध्ये 200 कोटी रूपयांचे विकासाचे गाजर दाखविले. मात्र, काहीच झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी व त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी या आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्हीही लोकप्रतिनिधींकडे निष्ठावंतांना डावलून दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देण्यावर या निवडणुकीमध्ये भर दिसून आला. यामुळे निष्ठावान आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना एकत्र करून ही तिसरी आघाडी निर्माण करण्यात आली आहे, असे कोठारी म्हणाले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख लालासाहेब सुद्रिक, सरपंच केतन पांडुळे, रामानना तोरडमल, रमेश वरकटे महावीर बाफना यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button