पानोडीमध्ये बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला | पुढारी

पानोडीमध्ये बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

संगमनेर शहर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फारुक हुसेनभाई सय्यद शेतातून पिकाला पाणी भरुन घराच्या दिशेने दुचाकीवरुन निघाले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला, मात्र या हल्ल्यात बिबट्याने मारलेला पंजा निसटला असता सय्यद यांनी गाडी जोरात चालविल्याने थोडक्यात बचावले.
दरम्यान, आदल्या दिवशी बिबट्याने कोकरावर हल्ला चढवून पळवून नेल्याने आता बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

‘देव तारी त्याला कोणी मारी’ या म्हणीनुसार शुक्रवारी साडे सातच्या सुमारास माळरानावर आपल्या शेतातील वांग्याच्या पिकाला पाणी देवून रोजा सोडण्याकरिता फारुक सय्यद हे घाई गडबडीत गावातील घराकडे मोटार सायकलवरुन निघाले होते. रस्त्याच्याकडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यांने त्यांच्यावर हल्ला चढविला, मात्र या हल्ल्यातून स्वतःला सावरत क्षणाचाही विलंब न करता गाडी सरळ पुढे निघून गेल्याने सय्यद यांच्या पाठीवर ओझरता पंजा लागला. बिबट्याच्या हल्ल्याची चाहूल लागताच सय्यद यांनी आरडा ओरडा करीत दुचाकी जोरात चालविल्याने बिबट्याच्या हल्ल्यातून ते सुखरुप बचावले.

बिबट्याने अनेक दिवसांपासून पानोडीमध्ये दहशत निर्माण केली आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ला होत आहे. पानोडी व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री – अपरात्री शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. वनविभागाने त्वरीत बिबट्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी आता पानाडीसह परिसरातील संतप्त नागरीकांकडून केली जात आहे.

Back to top button