श्रीरामपूर : आंबे घेऊन जाण्यासाठी ग्राहकांची गर्दी | पुढारी

श्रीरामपूर : आंबे घेऊन जाण्यासाठी ग्राहकांची गर्दी

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या तिथीवर केलेल्या कोणत्याही कार्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून ती ‘अक्षय’ मानली जाते. या दिवसांपासून अनेक घरांमध्ये आंब्याचे सेवन केले जाते. त्यामुळे या फळांच्या राजा व अक्षय्य तृतीयेचे विशेष मैत्री आहे.

खर्‍या अर्थाने अक्षय्य तृतीया व त्यापासून आंब्याचा हंगाम सुरू होत असल्याने, नेहरू मार्केट, शिवाजी रोड, मेनरोड विविध प्रकारच्या आंब्याची दुकाने थाटली आहेत. आज अक्षय्य तृतीय असल्याने विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. स्थानिक आंबे बाजारात दाखल होण्यासाठी 15 दिवसांचा अवधी असल्याने बंगलोर, रत्नागिरी, गुजरात, कोकण या ठिकाणाहून आंबे अक्षय्य तृतीयेसाठी शहरातल्या फळांच्या बाजारपेठेत दाखल झाले आहे.

यामध्ये बेंगलोर हापूस, रत्नागिरी हापूस, मलिका, बदाम, लालबाग, केशर, हापूस, पायरी आदी जातीचे आंबे बाजारात दाखल झाले आहे. बाजारात 100 रुपयांपासून ते 400 रुपये किलो, तर रत्नागिरी हापूस 1500 रुपये डझन या दराने विक्री केली जात आहे. तसेच लालबाग व केशर आंब्याना बाजारात जास्त मागणी आहे. अशी माहिती स्थानिक फळ विक्रेत्यांनी दिली.

अक्षय तृतीयेला, प्रत्येक घरी आमरस व पुरणपोळीचा बेत असतो, तर काही लोक अक्षय तृतीयाला गोर गरिबांना आंबे दान करतात. याच दिवशी कुलदैवत, ग्रामदैवत,यांना आंब्याचे नैवेद्य दाखवले जाते. आंबा आरोग्यासाठी पोषक असल्याने अक्षय तृतीया पासून आंबे खाण्यास सुरवात करतात. त्यामुळे आंब्याला बाजार पेठेत मोठी मागणी आहे.

आंब्याच्या दरात 25 टक्क्यांनी वाढ
हौशी लोकांची अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर फळाच्या राजाला घरी नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी ते बाजारात गर्दी करत आहे. यावर्षी इंधन दर व ट्रान्सपोर्टचे दर वाढल्याने बाहेरून येणार्‍या आंब्याचे दरात 25 टक्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती स्थानिक फळ विक्रेत्यांनी दिली.

Back to top button