शिर्डी : महिला पिग्मी एजंटच्या घरातून चोरी | पुढारी

शिर्डी : महिला पिग्मी एजंटच्या घरातून चोरी

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : पिग्मी एजंटचे काम करणार्‍या महिलेच्या घरी चोरी होऊन सुमारे 9 लाखांची चोरी झाली आहे. शहरातील महिला कमल ज्ञानेश्वर दसरे (वय 39, रा. विवेकानंद नगर, शिर्डी) या पिग्मी एजंटचे काम करतात. सदर महिला कुटुंबासमवेत दि. 16 एप्रिल रोजी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. देव दर्शनानंतर दि. 19 एप्रिल रोजी त्या शिर्डी येथे परत आल्या.

घराचा दरवाजा उघडून त्या आत गेल्या असता त्यांना बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांच्या मनात शंका आली. घराची पाहणी केली असता छताचा पत्रा देखील कापलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी घरातील कपाटे पाहिली असता त्यांना लॉकरमधील दागिणे आढळून आले नाहीत. अज्ञात चोरट्याने 30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार (किंमत 80 हजार), 50 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस (किंमत 3 लाख), 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे (60 हजार), 32 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट (23 हजार) व 3 लाख रुपये रोख असा 8 लाख 63 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

या महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, प्रविण दातरे, पोलिस कर्मचारी नितीन शेलार, अजय अंधारे, रिजवान शेख यांनी भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत.

Back to top button