कोपरगाव : ऊस उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर जागृती : बिपीनराव कोल्हे | पुढारी

कोपरगाव : ऊस उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर जागृती : बिपीनराव कोल्हे

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रति एकरी उत्पादन व साखर उतारा घटत आहे. यासाठी शेतकर्‍यांनी नेमके काय केल्याने उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढेल, यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने सतत जागरूकता ठेवली. त्यानुरूप कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्‍यांना ऊस विकासात्मक कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी थेट त्यांच्या बांधावर केली जात असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी केले.

दरम्यान, कारखान्याच्या ऊस विकास विभागांतर्गत प्रत्येक गटात प्रयोगशिल शेतकरी निवडून त्यांचे ऊस उत्पादन वाढीचे नियोजन हाती घेतल्याचे ते म्हणाले. सहकार महर्षी कोल्हे कारखाना व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हे कारखाना कार्यस्थळावर आज (शुक्रवारी) शेतकरी मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यात ऊस शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. निळकंठ मोरे, डॉ. डी. डब्ल्यू. ढवाळ, डॉ. एम. व्ही बोखारे, कृषीरत्न संजीव माने यांनी शेतकर्‍यांना जमिनीच्या मशागतीपासून ऊस लागवडीपर्यंत खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आदी सर्व शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली.

क्षारपड चोपण जमिनीची उत्पादकता, आडसाली, पूर्व हंगामी, खोडवा ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमात कोणती काळजी घ्यावी, याची सचित्र माहिती देत त्यांनी शेतकर्‍यांचे शंका समाधान केले. प्रारंभी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रति एकरी ऊस उत्पादन वाढ कार्यक्रम पुस्तिकेचे प्रकाशन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, मनेष गाडे, निलेश देवकर, बापूराव बारहाते, त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, सतिष आव्हाड, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार म्हणाले, कोल्हे साखर कारखान्यात देशपातळीवर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आगामी काळात निर्माण होणार्‍या स्पर्धेस सामोरे कसे जायचे, याचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी प्रास्तविकात कोल्हे कारखान्याने सभासद शेतकर्‍यांचे प्रति एकरी उसासह अन्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी काय उपाययोजना केल्या, यासह कार्यक्षेत्रात एकरी सुमारे 75 ते 116 मे. टन ऊस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची माहिती दिली.

बिपीनराव कोल्हे म्हणाले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कार्यक्षेत्रात प्रत्येक सभासद शेतकर्‍याचे प्रती एकरी ऊस उत्पादन वाढावे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून थेट बांधावर जाऊन मेळावे घेत प्रबोधन केले. ऊस वाढीसाठी धडक कृती कार्यक्रम आखून उत्कृष्ट बेणे पुरवून शेतकीतील प्रत्येकी एका कर्मचार्‍यास 10 शेतकरी निवडून त्यांचे लागवडीपासून ते थेट कारखान्यामध्ये ऊस गाळपास तुटून येईपर्यंतचे नियोजन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्व. कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. यातून 5 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी अंतराळ संशोधन संस्था नासासह जगाच्या कानाकोपर्‍यात काम करीत आहे. तद्वत शास्त्रज्ञांच्या ज्ञानातून उसासह अन्य पिकांचे उत्पादन वाढवून सुबत्ता निर्माण होण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन ऊस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजी देवकर, सी. एन. वल्टे यांनी करून आभार मानले.

आर्थिक सुबत्ता वाढविण्यावर भर..!
साखर उद्योग भारतातील सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री साखर उद्योगात स्थैर्य व आर्थिक सुबत्ता वाढविण्यावर भर देत असल्याचे बिपीनराव कोल्हे यांनी आवर्जून सांगितले.

Back to top button