नगर : छत्रपती शिवराय केसरीला पोलिसात नोकरी मिळावी : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

नगर : छत्रपती शिवराय केसरीला पोलिसात नोकरी मिळावी : चंद्रशेखर बावनकुळे

नगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात कुस्तीला मोठी परंपरा आहे. कुस्तीत जो प्रथम आला त्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिस खात्यात घेतले. आता नगरमध्येही मोठी स्पर्धा होत आहे. येथे प्रथमच सोन्याची एवढी मोठी गदा देणार असल्याचा अभिमान वाटत आहे. जो कुस्तिगीर ही गदा जिंकेल त्यालाही पोलिस खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली पाहिजे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भाजप-शिवसेना व जिल्हा तालिम संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे संघटनमंत्री विजय चौधरी, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संयोजन समितीचे वसंत लोढा, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास बेरड आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, की भारतात पुरातन काळापासून कुस्ती खेळली जाते. कोरोनाच्या संकटानंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्तीचे महत्त्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही ही भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बजेटमध्ये निधी वाढवला आहे. या वर्षी स्पर्धेच्या विजेत्यास अर्धा किलोची गदा दिली आहे.

मंत्री विखे म्हणाले, की कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी कोणतीही महत्त्वाकांक्षा न ठेवता एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. नगर जिल्ह्याला कुस्तीची मोठी वैभवशाली परंपरा आहे. ती जपली जात आहे. कुस्तीला सरकारने अजून पाठबळ द्यावे.
प्रास्ताविक वसंत लोढा यांनी केले. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी स्वागत केले. सचिन पारखी यांनी आभार मानले.

पुढची गदा विखेंनी द्यावी
भाजप-शिवसेना युतीने कुस्तीच्या इतिहासात प्रथमच अर्धा किलो सोन्याची गदा विजेत्यासाठी ठेवली आहे. पुढच्या वर्षी खासदार विखे पाटील व महसूलमंत्री विखे पाटील यांनी दोघांनीही अर्धा-अर्धा अशी एक किलो सोन्याची गदा कुस्तीपटूंसाठी ठेवावी. राज्याच्या भल्यासाठी ही युती कायम ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ द्यावी, असे आवाहन आमदार बावनकुळे यांनी केले.

Back to top button