नगर : छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात | पुढारी

नगर : छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात भाजप-शिवसेना व जिल्हा तालीम संघातर्फे आयोजित छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर भव्य स्टेज उभारणी, तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. वाडिया पार्क मैदानावर 150 फूट बाय 50 फूट, असे आखाडा स्टेज, 60 फूट बाय 20 फुटाचे व्यासपीठ, तसेच 60 फूट बाय 60 फूटाचे व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. स्टेजच्या मागे किल्ल्याच्या प्रतिकृतीचे चार बुरुज उभारण्यात आलेेत.

वाडियापार्क मैदानाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कमानी उभारण्यात आल्या आहेत. सुमारे 10 ते 15 हजार नागरिकांची आसन क्षमता येथे आहे. स्पर्धा तिन्ही दिवस सकाळी 7 ते 9 व दुपारी चार ते रात्री 10 वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी यांनी दिली.

छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेनिमित्त आज (दि.21) सकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेसाठी बेळगाव निपाणी येथून खास हात्ती आणला आहे. शोभायात्रेत घोडे, उंटसह ढोल-ताशा, तुतारी, हलगी पथकांचा समावेश असेल. शोभायात्रेत दोन व्हेन्टेज कारमध्ये प्रमुख पैलवान बसणार आहेत, अशी माहिती संयोजक अनिल शिंदे यांनी दिली.

कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातून नामवंत पैलवानांचे आगमन नगर शहरात होण्यास आज सकाळपासून सुरुरवात झाली असून, त्यांचे वजना व गट तयार करण्याच्या काम सुरू झाले आहे, अशी माहिती तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली. छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, बाबूशेट टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे व प्रशांत मुथा आदी परिश्रम घेत आहेत.

Back to top button