जामखेड बाजार समिती :आ. प्रा. राम शिंदे आणि रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला ! | पुढारी

जामखेड बाजार समिती :आ. प्रा. राम शिंदे आणि रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला !

दीपक देवमाने

जामखेड : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत आ. रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पॅनलमध्ये लढत रंगणार आहे. निवडणुकीत चुरस वाढल्याने दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छाननीनंतर 182 अर्ज राहिले होते, त्यानुसार अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 144 अर्ज माघारी घेण्यात आले. यामुळे 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

यामध्ये सेवासोसायटी सर्वसाधारण मतदार संघ व ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघात एक-एक अपक्ष उमेदवार राहिले आहेत. यामुळे जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रा. राम शिंदे विरोधात आमदार रोहित पवारांची सरळ लढत होणार आहे. यामुळे या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

आमदार पवारांबरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, तर आमदार शिंदेंना सचिन गायवळ यांनी साथ दिल्याने ही बाजार समितीची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. डॉ. भास्कर मोरे यांची माघार घेतली असून, पॅनेल न करण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य उमेदवाराला मदत करणार असल्याचे डॉ. मोरेंनी सांगितले. दोन्ही गटाने अपक्ष उमेदवार राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे फक्त दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपातच लढत रंगणार आहे.

भाजपला पाठींबा : प्रा. गायवळे
प्रा. सचिन गायवळ यांनी समर्थकांसोबत चर्चा करत आमदार प्रा. राम शिंदेंना पाठींबा देण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाजार समिती निवडणुकीत भाजपबरोबर जायची भूमिका घेतल्याचे प्रा. गायवळ यांनी सांगितले.

‘त्या’ वक्तव्याचा कितपत फायदा?
आमदार प्रा. राम शिंदे यांनी नुकतेच नगर येथे म्हणाले की, ‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी सज्ज असून, पक्षाने आदेश दिल्यास लढणार आहे,’ असे सुतोवाच केले होते. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर अतिक्रमण होणार का? अशा चर्चा असून, या वक्तव्या मागील राजकारण मात्र वेगळेच होते. कर्जत-जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत विखे गटाचे समर्थक म्हणून असलेले जामखेडमधील सहकारातील नेते आमदार शिंदे यांच्याबरोबर न येता ते आमदार पवार यांच्याबरोबर जाणार असल्याने ते वक्तव्य केल असल्याची चर्चा मतदार संघात होती. परंतु, त्याचा काही फरक विखे समर्थक सहकारील नेत्यांना पडला नसून, आमदार पवार यांच्या बरोबर हातमिळवणी झाली. यामुळे ज्या निवडणुकीसाठी विधान केले होते, त्याचा फारसा फायदा आमदार प्रा. शिंदे यांना झाला नसल्याचे या समीकरणातून दिसून येत आहे.

उमेदवारांना सहकार्य करणार : डॉ. मोरे
सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका राजकीय पक्ष म्हणून लढविल्या जात नसतात. त्यामुळे जन जागरण युवा मंचच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभा न करता शेतकरी हिताचे निर्णय घेऊ शकतील अशा सक्षम उमेदवारांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉ.भास्कर मोरे यांनी दिली.

  • डॉ भास्कर मोरेंची माघार; योग्य उमेदवाराला करणार मदत
  • आमदार पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात एकत्र
  • आमदार प्रा. राम शिंदेंना प्रा. सचिन गायवळ यांचा पाठींबा

Back to top button