नगर तालुका : भाजप – महाविकास आघाडीत सरळ लढत; नवीन चेहर्‍यांना संधी | पुढारी

नगर तालुका : भाजप - महाविकास आघाडीत सरळ लढत; नवीन चेहर्‍यांना संधी

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीतून अर्ज माघारी घेणार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 193 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 16 जागेसाठी 35 उमेदवार रिंगणात असून व्यापारी मतदारसंघातून सुप्रिया कोतकर व राजेंद्र बोथरा यांची बिनविरोध निवड झाली. तर, नगरमध्ये भाजप – महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामपंचायत व सेवा संस्था मतदारसंघातील 15 जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीत काट्याची टक्कर होणार आहे. विद्यमान 16 संचालकांना यंदा संधी नाकारण्यात आली असून, नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 228 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यातून 193 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. व्यापारी मतदारसंघातून दोन जागांसाठी सुप्रिया कोतकर व राजेंद्र बोथरा यांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हमालमापाडी मतदारसंघात एका जागेसाठी दोन अर्ज शिल्लक राहिले. जिल्हा बँकेंचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कर्डिले यांच्या गटातून नीलेश सातपुते यांचा अर्ज दाखल झाला. किसन सानप यांनी अपक्ष अर्ज ठेवल्याने सातपुते यांची बिनविरोध निवड हुकली. महाविकास आघाडीने केवळ सेवा संस्था व ग्रामपंचायत विभागातील 15 जागांसाठीच उमेदवार दिल्याने आता या जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीत काट्याची लढाई होणार आहे.

अनेक इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली. विद्यमान संचालकांपैकी संतोष मस्के हरिभाऊ कर्डिले व राजेंद्र बोथरा या तिघांना पुन्हा निवडणुकीची संधी देण्यात आली असून, उर्वरित 15 जागेवर कर्डिले गटाकडून नवीन चेहर्‍यांना उतरविण्यात आले आहे. महाविकास आघाडीकडून दिग्गज उमेदवार देऊन कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

निवडणूक दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेची
महाविकास आघाडीला आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, घनश्याम शेलार यांची रसद मिळणार आहे. तर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना खासदार सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, कोतकर समर्थकांकडून निवडणुकीत मदत होणार आहे.

संदीप व रोहिदास कर्डिले यांना उमेदवारी
संदीप कर्डिले, रोहिदास कर्डिले यांनी महाविकास आघाडीकडून बाजार समितीसाठी अर्ज दाखल केले होते. रोहिदास कर्डिले यांना बाजार समितीसाठी उमेदवारी देण्यात आली, तर संदीप कर्डिले यांना जेऊर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचा शब्द महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे.

भाजप -कर्डिले गटाचे उमेदवार
व्यापारी : सुप्रिया कोतकर व राजेंद्र बोथरा (बिनविरोध), मापाडी : नीलेश सातपुते, सेवा सोसायटी : (सर्वसाधारण), संजय गिरवले, सुधीर भापकर, राजेंद्र आंबेकर, रभाजी सूळ, मधुकर मगर, भाऊसाहेब भोर, सुभाष निमसे, महिला राखीव : आचल सोनवणे, मनीषा घोरपडे, एनटी : धर्मनाथ आव्हाड, ओबीसी : संतोष म्हस्के, ग्रामपंचायत (सर्वसाधारण) भाऊसाहेब बोठे, हरिभाऊ कर्डिले, दत्ता तापकीरे (दुर्बल घटक), भाऊसाहेब ठोंबरे (अनुसुचित जाती)

महाविकास आघाडीचे उमेदवार
सेवा संस्था (सर्वसाधारण) : उद्धव दूसुंगे, संदेश कार्ले, रोहिदास कर्डिले, रा. वी. शिंदे, अजय लामखडे, संपतराव म्हस्के, भाऊसाहेब काळे, महिलाराखीव : राजश्री लांडगे, संगीता ठोंबरे, एनटी : विठ्ठल पालवे, ओबीसी : शरद झोडगे, ग्रामपंचायत (सर्वसाधारण) : अंकुश शेळके, शरद पवार, प्रवीण गोरे (दुर्बल घटक), सुरेखा गायकवाड (अनुसुचित जाती).

Back to top button