कर्जतमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाजपच्या पॅनेलचे उमेदवार | पुढारी

कर्जतमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाजपच्या पॅनेलचे उमेदवार

गणेश जेवरे

कर्जत : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधून उमेदवारी केली आहे. यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्ष सदस्य व तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे काही जागांसाठी तिरंगी लढत होणार आहे. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये या निवडणुकीत काटे की टक्कर निर्माण झालेली आहे. त्यामुळेे निवडणुकीकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बाजार समितीची निवडणूक यावेळी मोठी चुरशीची होणार असे चित्र दिसत होते. निवडणुकीत तिरंगी लढत होईल, असे वाटत होते.

मात्र, जिल्हा बँकेचे संचालक व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले अंबादास पिसाळ यांची नाराजी दूर करण्यात आमदार राम शिंदे यांना यश आले आहे. निवडणुकीत तिसरी आघाडी होणार असे पिसाळ हे स्वतः सांगत असलेतरी, त्यांना अखेर आमदार राम शिंदे यांच्या सोबतच जावे लागले. या निवडणुकीसाठी 212 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.

यामध्ये तब्बल 167 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. आता एकूण 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सहकारी संस्थांमधून 11, ग्रामपंचायत मतदारसंघातून 4, आडते-व्यापारी मतदारसंघातून 2, हमाल-मापाडी मतदारसंघातून एक, अशा एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

एकूण 2 हजार 577 मतदार
या निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 577 मतदार आहेत. यामध्ये तालुक्यातील सहकारी संस्थांचे 972 मतदारांचा समावेश आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात 845, आडते -व्यापारी मतदारसंघात 468, तर हमाल-मापाडी मतदारसंघात 292 मतदार आहेत.

शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष थेट भाजपच्या पॅनलमध्ये जाऊन बसले. नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांना काही जागा बिनविरोध करून धक्का दिला होता. या निवडणुकीत आमदार शिंदे यांनी आमदार पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष भाजपकडून उभा केला आहे.

काकासाहेब तापकीर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष असताना निवडणुकीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना पक्षातून व तालुकाध्यक्ष पदावरून तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.
                                 – राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

सहकारामध्ये पक्षीय निवडणूक नसते. त्यामुळे मी कोणतेही पक्ष विरोधी कोणतीही काम केलेले नाही. त्यामुळे माझ्यावरील कारवाई चुकीची आहे.

                                    – काकासाहेब तापकीर, कर्जत

  • काकसाहेब तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी
  • 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात
  • अंबादास पिसाळ आमदार शिंदे यांच्यासोबत

Back to top button