शशिकांत भालेकर
पारनेर: खासदार डॉ.सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात लक्ष घातले असून बाजार समिती निवडणुकीत भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्र येतील का? असा सवाल उपस्थित झाला होता. आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांचे विखेंचा पारनेर तालुक्यातील हस्तक्षेप कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनोमिलन झाले असल्याचे बोलले जात आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी हे एकत्र आले आहेत. मात्र, बाजार समिती हे निमित्त असले तरी येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी गुरु शिष्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 2018 ला औटी- लंके यांच्यात संघर्ष सुरू झाला. २०१९ विधानसभेला औटी यांचा दारुण पराभव करत आमदार निलेश लंके यांनी बाजी मारली. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेका विरोधात रोष होता. नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीचे सूर जुळले नाहीत. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी विरोधात स्वतंत्र पॅनल उभा केला. भाजपला नगरपंचायत निवडणुकीत पॅनल उभा करता आला नाही. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. त्यावेळी औटी लंके हे एकत्र आले नाहीत. निकाल त्रिशंकू लागल्याने एकत्र येण्याची संधी असताना देखील तसे झाले नाही. मात्र, बाजार समितीचे निमित्त साधत एकत्र येण्यामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत तालुक्यात चर्चा रंगली आहे.
आगामी लोकसभेला आमदार निलेश लंके राष्ट्रवादीकडून प्रमुख दावेदार मानले जातात. त्यादृष्टीने लंके यांनी नगर दक्षिण मतदार संघामध्ये जुळवाजुळव सुरू करत मोट बांधली आहे. लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असल्याने आमदार निलेश लंके हे खासदारकीचे उमेदवार राहिले तर तालुक्यात आमदारकीसाठी नेमका कोणता चेहरा दिला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार विजय औटी यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता दोघांच्या एकत्रित आल्याने मतदारांना वाटू लागली आहे.
आमदार निलेश लंके खासदारकीसाठी राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार असल्याने गेल्या काही दिवसांपासून लंके आणि विखे यांच्यात शीत युद्ध सुरू आहे. एकमेकांचा उल्लेख न करता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना दिसत आहेत. तसेच, गेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके विरोधात विजय औटी अशी सरळ लढत झाली होती. यावेळी खासदार सुजय विखे यांनी सोबत राहत युतीचा धर्म पाळला नसल्याची खदखद माजी आमदार विजय औटी यांच्या मनामध्ये आहे. दोघांनीही खासदार सुजय विखे यांना थोपवण्यासाठी ही आघाडी केली असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ बांधली गेली आहे. तालुक्यात अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांसमोर लढत होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडी असताना तालुक्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो म्हणून बाजार समिती निवडणुकीत एकत्र आले असल्याचे आमदार लंके व माजी आमदार विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाजार समिती निवडणुकीत सर्व 18 उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दोघांनीही सांगितले आहे.
तालुक्यातील बाजार समितीची सत्ता तालुक्याच्या हातात राहिली पाहिजे. जिल्ह्यातील राजकीय हस्तक्षेप त्यात होता कामा नये व तो कोणी करू नये या समान भावनेचा धागा बांधून आम्ही संयुक्तपणे पॅनल तयार केला आहे. भाजपने जे राज्यात केलं, ते लोकशाहीला धरून नाही. राज्यघटनेला ही लोकशाही अपेक्षित नाही. ते रोखण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र काम करणार आहे.
– विजय औटी, माजी आमदार पारनेरराज्यात महाविकास आघाडीचे अडीच वर्ष सत्तेतील चांगले काम सुरू होते. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सहकारातील ही तालुक्यातील पहिली निवडणूक व त्या निवडणुकीला सामोरे जात असताना राज्यातील राजकारणाची शिस्त तालुक्यात पाळली पाहिजे, या हेतूने येथे महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय झालेला आहे. तालुक्यात अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहे. विधानसभेनंतर पुन्हा एकत्र येण्याचे आमच्या दोघांच्याही मनात होते. मात्र, त्यासाठी काहीतरी माध्यम लागतं. आता निवडणूक लागली आणि आम्ही एकत्र आलो.
– निलेश लंके- आमदार, पारनेर