अहमदनगर : अंगणवाडी सेविकांना मंदिरासाठी वर्गणीची सक्ती! | पुढारी

अहमदनगर : अंगणवाडी सेविकांना मंदिरासाठी वर्गणीची सक्ती!

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरातील अंगणवाडी सेविकांनी एका मंदिराच्या सभामंडपासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची वर्गणी गोळा करावी, असे फर्मान बालविकास प्रकल्प विभागाच्या एका महिला अधिकार्‍याने सोडले आहे. त्यासाठी पावतीपुस्तकेही या सेविकांना देण्यात आल्याचे समजते.

भेंडा येथील एका बालवाडीत बुधवारी (दि. 19) झालेल्या बैठकीत या महिला अधिकार्‍याने हे फर्मान सोडल्याचे काही सेविकांनी सांगितले. त्यासाठीची पावतीपुस्तकेही लगेच देण्यात आली. मात्र काही सेविकांनी बैठक संपताच या सक्तीच्या वर्गणीला विरोध दर्शविला आणि संबंधित अधिकार्‍यांकडे नाराजीही व्यक्त केली. काही सेविकांनी स्पष्ट नकार देत पावतीपुस्तके स्वीकारली नाहीत.

मात्र बैठकीनंतर संबंधित वर्गणीसक्तीची बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना बिगरसरकारी कामासाठी पैसे जमवण्याचा आदेश देण्याची परवानगी अधिकार्‍यांना कोणी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे. वाहनभाडे लाचप्रकरण ताजे असताना वर्गणी आणण्याची सक्ती करणार्‍या या अधिकार्‍यावर कारवाईची मागणी अंगणवाडी सेविकांमधून केली जात आहे.

Back to top button