पेपर अवघड गेला, ‘सर, मला पास करा.! उत्तरपत्रिकेत मथळा लिहून शिक्षकांना साकडे | पुढारी

पेपर अवघड गेला, ‘सर, मला पास करा.! उत्तरपत्रिकेत मथळा लिहून शिक्षकांना साकडे

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : ‘सर, मला पास करा, मला पेपर अवघड गेला आहे, आपण पेपर तपासताना मला जास्त गुण देवून पास करा, आणि तुमचा गुगल पे किंवा फोन पे नंबर द्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. उत्तरपत्रिकांमध्ये असे मथळे लिहिलेले पाहून शिक्षकही अचंबित झाले आहेत. करोनानंतर सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत.

या काळात दहावी-बारावीतील परीक्षा देणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. या काळात शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. या काळात सात किंवा आठवीला असणारे विद्यार्थी आता दहावीला आहेत. त्यांनी नुकतीच दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दिली आहे.

नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीचा पेपर तपासताना पेपरमध्ये ‘सर मला पास करा, नापास झाली, तर घरचे माझे लग्न लावतील, असे साकडे घातल्याचे समोर आलेले असताना, श्रीगोंदा तालुक्यातील एका नामवंत विद्यालयात बाहेरील जिल्ह्यातून दहावीच्या बोर्डाचे पेपर तपासणीसाठी आलेले आहेत.

हे पेपर तपासताना उत्तर पत्रिकेत शेवटी एका विद्यार्थ्यांने लिहिले होते, ‘सर मला पेपर अवघड गेला आहे, तरी आपण पेपर तपासताना मला गुण वाढून द्या, अन् तुमचा गुगल पे, मोबाईल नंबर द्या, ‘मी तुम्हाला पैसे पाठवून देतो,’ असा मजकूर लिहिलेला आहे.

दरवर्षी विद्यार्थी उत्तरपत्रिकांवर काहीतरी मजकूर लिहीत असतात. विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह लेखन केल्यास त्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात येते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यंदा शिक्षण मंडळाने शिक्षा सूची जाहीर केली होती.
ही सूची प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना समजून सांगावी, असे कळविले होते.

निकाल घटण्याची शक्यता
दहावी बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोर्‍याच ठेवल्याचे दिसून आले आहे. यावर्षी दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची कोरोनामुळे सातवी-आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दोन वर्षे परंपरागत शिक्षण न झालेले विद्यार्थी यावेळी दहावी-बारावीच्या परीक्षांना बसले होते. यामुळे यंदा निकालाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाचा हा परिणाम असल्याचे उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांचे म्हणणे आहे.

गेली तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे अभ्यास कमी झाला, तसेच विद्यार्थी-पालक-शिक्षकांमध्ये सोशल मीडियामुळे दुरावा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरण बदलणे गरजेचे आहे.

                                                               -संबंधित शिक्षक, काष्टी.

Back to top button