नगर : कृषी, उद्योग, पर्यटनाला प्राधान्य द्या ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश | पुढारी

नगर : कृषी, उद्योग, पर्यटनाला प्राधान्य द्या ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश

नगर : पुढारी वृत्तसेवा : विकसित भारत निर्माणामध्ये प्रत्येक राज्य व जिल्ह्याचा अधिक प्रमाणात विकास होणे गरजेचे आहे. त्यानुसार कृषी, उद्योग, पर्यटन, पशुसंवर्धन विकास या बाबींना प्राधान्य देत अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक झाली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागप्रमुख, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केंद्र शासनाकडून करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज लक्षात घेऊन, जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीबरोबरच कृषी प्रक्रिया व स्टोरेजवर अधिक भर देण्यात यावा. नगदी उत्पादन देणार्‍या रेशीम उद्योगवाढीसाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच जिल्ह्यात रेशीम प्रोसेसिंग युनिट उभारले जाऊ शकते काय, याबाबत माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

Back to top button