नगर : धक्कादायक ! विद्यार्थ्यांच्या हाती चोरीचे मोबाईल | पुढारी

नगर : धक्कादायक ! विद्यार्थ्यांच्या हाती चोरीचे मोबाईल

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात अल्पवयीन गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. अकोलेसह राजूरमध्ये चोरीच्या महागड्या मोबाईलची सर्रास खरेदी- विक्री होत असल्याने काही टवाळखोर पोरं मुलींना चोरीचे मोबाईल गिफ्ट देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही मुले- मुली शाळा प्रशासनासह कुटुंबियांपासून चोरी-चोरी छुपके-छुपके असे मोबाईल वापरत असल्याने तरुणाईस सैराट होण्यास या मोबाईलचा आधार मिळत आहे. दरम्यान, शाळा भरताना व शाळा सुटताना पालक व पोलिसांनी यावर ‘वॉच’ ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

अकोले शहरासह राजूर, भंडारदरा, कोतूळ, समशेरपूर, ब्राम्हणवाडा परिसरात शालेय विद्यार्थ्यांसह तरुणाई क्राईमच्या विळख्यात अडकू नये यासाठी अकोले, राजूर पोलिस व सामाजिक संघटना व पालकांनी अल्पवयीन गुन्हेगारी तसेच अजाणत्या वयात सैराट होण्याविरोधात ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अकोले तालुक्यात अल्पवयीन व विवाहित तरुण-तरुणी सर्रास सैराट होत असल्याच्या घटनांची नोंद मोठ्या प्रमाणात अकोले, राजूर पोलिस ठाण्यात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही महिन्यांपूर्वी अकोले तालुक्यात चोरीचे मोबाईल अकोला शहरासह राजूरमधील काही मोबाईल शॉपींमध्ये पोलिसांना आढळल्यावर या चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असे असले तरी काही मोबाईल शॉपींमधून चोरीचे महागड्या मोबाईलची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सूरू आहे.

आदिवासी भागातील आश्रम शाळांसह शहरात शाळांमध्ये काही मुले- मुली चोरून मोबाईल वापरतात. यातुन मुले- मुली पळून जात आहेत. बाल वयात गुन्हेगारीच्या वाढत चाललेल्या या घटनांची वास्तव परिस्थिती समोर आणली जात आहे. टवाळखोरांमुळे इतर सुसंस्कारीत मुले बिघडू नये, मुलींचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रत्येक आश्रम शाळेत अधीक्षक-अधिक्षिका, शिक्षक व पालकांनी मुला-मुलींचे दप्तर, सॅक घरात अडगळीच्या जागा आठवड्यातून एकदा तरी तपासाव्या. शाळा प्रशासनाने मुलांच्या शाळांची दप्तरे तपासावी. पोलिसांनी शाळा भरताना व सुटताना परिसरात थांबणार्‍या टवाळखोर युवकांची झाडा झडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात जे शालेय व आश्रम शाळेतील मुले-मुली शाळा कालावधीत चोरून मोबाईल वापरतात. यापैकी काही मोबाईल चोरीचे असावेत. हे मोबाईल मित्रांनी त्यांना गिफ्ट दिले आहेत.

अकोले तालुक्यात जुने मोबाईल घेताना ओरिजनल बिल घ्यावे. दुरुस्तीस आलेले मोबाईल दुकानदारांनी मोबाईलधारकाचे आधार कार्ड व बिल घ्यावे. कोणी बेकायदेशीरपणे मोबाईल घेतले किंवा मोबाईलची विक्री करताना आढळल्यास कारवाई करू.
                                                 -स. पो. नि. गणेश इंगळे, राजूर पोलिस स्टेशन.

आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इ. 1 ली ते 12 वीपर्यंत शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये, अशा मुख्याध्यापक, अधीक्षकांना सूचना दिल्या. आश्रम शाळेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळल्यास कारवाई करु.
                                                 -एन. एल. झरेकर, स. प्रकल्पाधिकारी, राजूर.

Back to top button