पुणतांबेसह वाडी-वस्त्यांचा पाणीप्रश्न मिटणार ! | पुढारी

पुणतांबेसह वाडी-वस्त्यांचा पाणीप्रश्न मिटणार !

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा :  येथील ‘जलस्वराज्य टप्पा- 2’ मधील योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना नव्याने जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. यामुळे गावासह वाडी-वस्तीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘जलस्वराज्य प्रकल्प’ या सुमारे 17 कोटी रुपये खर्चाच्या योजनेतील नवीन साठवण तलाव, चार जलकुंभ, अंतर्गत जलवाहिनी ही कामे पूर्ण झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत साडेसोळा कोटी रुपयांची योजना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली आहे. यामध्ये जुना साठवण तलाव दुरुस्ती करून कागद टाकणे तसेच वाड्या वस्त्यांवर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा व नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामे केली जाणार असल्याने गावाला वर्षानुवर्षे भेडसावणार्‍या पाणी टंचाईपासून सुटका होणार आहे.

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामातील जुन्या साठवण तलावाच्या खोलीकरण कामास सुरुवात झाली असून या तलावास मोठ्या प्रमाणात पाणी गळती असल्याने केवळ 18 ते 20 दिवसात तलाव कोरडा पडत आहे. त्यातच गोदावरी कालव्यातून सुटणारे आवर्तनाचा कालावधी लांबल्यास गावाला हमखास पाणीटंचाई जाणवत होती. मं विखे यांच्याकडील पाठपुराव्यामुळे तलावाच्या वाढीव कामाला मंजुरी मिळाल्याने दोन महिने पुरेल इतकी पाणी क्षमता होणार असून खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पाणी पुरवठा योजनेची जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी झाल्याने गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. नवीन योजनेत जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार असून तसेच वाड्या वस्त्यावर 8 कि. मी. अंतराची जलवाहिनी टाकण्यात येऊन पाणी पुरवठा केला जाणार आहे.

कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटणार
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालिनीताई विखे यांच्या प्रयत्नातून 16 कोटी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन योजनेस मंजुरी मिळाली आहे. या कामामुळे गावासह वाडी वस्तीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी दूर होणार असून जलस्वराज्यतील योजना यशस्वीपणे सुरू आहे. जलजीवन मिशन योजना कामाचे भूमिपूजन समारंभ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला जाणार आहे. गावाचा चेहरामोहरा बदलून मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा संपूर्ण विकास करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले.

Back to top button