देवठाण : जलजीवन पाणी योजनेचा सर्व्हे चुकीचा; योजनेचे वाजले तीन तेरा नऊ बारा | पुढारी

देवठाण : जलजीवन पाणी योजनेचा सर्व्हे चुकीचा; योजनेचे वाजले तीन तेरा नऊ बारा

देवठाण; पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील देवठाण येथील तीन गावांसाठी व वाडी वस्त्यांसाठी जलजीवन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची नळ योजना होणार आहे. या योजनेच्या कामाचा सर्वे करणार्‍या कंपनीने चुकीचा सव केल्याने ह्या कामाचे तीन तेरा वाजले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याचे पुन्हा सुधारित सर्व्हे, करावा अशी मागणी केली आहे.

देवठाण येथील बारा वाड्यांसह दोडकनदी व वरखरवाडी या गावांना पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनेसाठी 25 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामध्ये 19 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी दहा टाक्या जुन्याच टाक्या वापरणार असल्याने देवठाण ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे अधिकार्‍यांना वारंवार सांगून सुद्धा काहीही उपयोग होत नाही. हा सर्व्हे आम्ही केला नसून सर्व्हे करण्यासाठी स्वतंत्र कंपनी होती. त्यांनी तो सर्वे केला असल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही, अशी उत्तरे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या अधिकार्‍यांकडून दिली जात आहेत.

शासकीय अधिकार्‍यांनी याबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन केले तर गावांमधील लोकांमध्ये एकमेकात भांडणे होणार नाहीत. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही. त्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकार्‍यांचे अधिकार्‍यांनी पारदर्शकपणे माहिती जनतेसमोर मांडली मांडली पाहिजे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता इंजिनीयर मधुकर बिन्नर हे स्थानिक रहिवासी असल्याने ते लोकांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. मला खूप कामे आहेत, वेळ नाही असं म्हणून ते वेळ मारून नेतात.

त्यामुळे या पाणी योजनेच्या कामावर संदर्भात स्थानिक ग्रामस्थांचा व वाडीवस्तीवरच्या लोकांचा सगळा रोष ग्रामसेवक व ग्रामपंचायतवर वाढत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ऐकून घेत नाही, म्हटल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. या सर्वांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे संगममेर येथील कार्यकारी अभियंता वारे आणि नाशिक येथील मुख्य अभियंता भुजबळ यांच्याही कानावर घातली आहे.

गावात याबाबत अधिकार्‍यांनी ग्रामसभा घ्यावी, ग्रामस्थांना डिझाईन दाखवावी, लोकांना विश्वासात घेऊन ज्या टाक्या वापरण्या योग्य आहेत. त्यांचा वापर करण्यास हरकत नाही, परंतु ज्या टाक्या गळतात त्या ठिकाणी नवीन टाक्या बांधाव्यात ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

सर्व्हे करणार्‍या कंपनीने या सर्व मध्ये 50 टक्के चुका केलेल्या आहेत, त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
ज्या भागात आजही सरकारी पिण्याच्या पाण्याचा टँकरने पाणी जात आहे. त्याच वाड्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी जुनीच वापरली जाणार आहे. ही बाब अत्यंत चुकीचे आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दरबारात सुटेल व आम्हाला सर्वांना सर्वच्या सर्व नवीन टाक्या मिळतील, अशी अपेक्षा शिवाजी पाटोळे, सुधीर शेळके, तुळशीराम कातोरे, जालिंदर बोडके, राम सहाने, पांडुरंग मेंगा, खेमा पथवे, रोहिणी सोनवणे आदींनी म्हटले आहे.

पालकमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे
या कामावर नियुक्त केलेले ठेकेदार हे नांदेड येथील आहेत. त्यांनी हे काम कोणालातरी नाशिक जिल्ह्यातील व्यक्तीस बघायला सांगितले आहे. मॅनेजर म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीने ग्रामस्थांना अजिबात विश्वासात घेतलेले नाही. तेव्हा वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घातले नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ग्रामस्थ धाव घेऊन त्यांनी या कामी लक्ष घालावे, अशी मागणी करणार आहेत.

Back to top button