नेवाशात मोकाट जनावरांविरोधात मोहीम | पुढारी

नेवाशात मोकाट जनावरांविरोधात मोहीम

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा नगर पंचायततर्फे शहर परिसरात फिरणार्‍या मोकाट जनावरांची धरपकड सुरू केली असून, दोन दिवसांपूर्वी चार जनावरांना नगर पंचायतीच्या पथकाने पकडले. पकडलेल्या जनावरांची कोणीची मालकी न सांगितल्याने सर्व जनावरे गोशाळेत ठेवण्यात आली, अशी माहिती मुख्याधिकारी आंबादास गर्कळ यांनी दिली. नेवासा नगर पंचायतचे मुख्याधिकारी आंबादास गर्कळ यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगर पंचायतने नेवासा शहरात मोकाट जनावरांच्या विरोधात धरपकड मोहीम हाती घेतली.

सोमवारी (दि.16) कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, अभियंता निखिल नवले, भाऊसाहेब म्हसे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कर्मचारी ताराचंद चव्हाण, संभाजी सरोदे, नवनाथ मतकर, राजू भोडगे, राजेंद्र चौरे, रोहित चव्हाण, अशोक सोनवणे, अजय चक्रनारायण, अरूण चव्हाण, राजेश्वर सोनवणे, परशुराम डौले, योगेश गवळी या कर्मचार्‍यांच्या पथकाने शहरातील राम मंदिरामागे चिंचेच्या झाडा खाली मोकाट फिरणारे चार जनावरे पकडून त्यांची रवानगी गोशाळेत संगोपणासाठी करण्यात आली.

नेवासा शहरात मोकाट फिरणार्‍या जनावरांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. जनावरांचे मालकांनी आपले जनावरे शहरात मोकाट सोडू नये.

                    -आंबदास गर्कळ, मुख्यधिकारी, नेवासा.

Back to top button