कर्जतमध्ये ओव्हरलोडिंग वाहने मोकाट | पुढारी

कर्जतमध्ये ओव्हरलोडिंग वाहने मोकाट

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रस्ता रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कंपनीकडून रस्ते कामास आवश्यक गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी तालुक्यातील अनेक रस्ते वापरात आणले. या रस्त्यांची पुरती वाट लागली. कंपनीच्या ओव्हरलोडिंग धावणार्‍या वाहनांवर कोणाचे नियंत्रण नसल्याची बाब समोर आली आहे.

सरकारी प्रकल्पाच्या नावाखाली गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. दंडात्मक कारवाई करणार्‍या महसूल, परिवहन, पोलिस विभागाला ठेकेदारांची ओव्हरलोडिंग वाहने दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ओव्हरलोडिंग धावणार्‍या वाहनांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. ही वाहने व रात्रंदिवस सुरू असणारी गौण खनिजांची नियमबाह्य वाहतूक कळीचे मुद्दे आहेत.

दहाचाकी ट्रकची मालवाहतूक क्षमताही 16 टनापर्यंत असते. प्रत्यक्षात 22 ते 25 टन मालाची वाहतूक करण्यात येते. शासनाचा गौण खनिज वाहतुकीसाठीचा नियम साडेतीन ब्रास इतका आहे. प्रत्यक्षात वाहतूक मात्र दुप्पट क्षमतेने म्हणजेच सात ब्रासपेक्षा अधिक करण्यात येत आहे. त्याकडे संबंधित यंत्रणाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

रस्त्याच्या नशिबी वनवास
अनेक गावांत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाला लागणारे गौण खनिज आणताना ओव्हरलोडिंग वाहनांमुळे तालुक्यातील बहुसंख्य गावातील रस्त्यांची वाट लागली. ग्रामीण भागातील जनतेला रस्त्यावरील खडी चुकवत आणि ठेचा खात मार्गक्रमण करावे लागत आहे.

Back to top button