

नगर; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक केडगाव येथे सुरू असताना काही समाजकंटकांनी या मिरवणुकीमध्ये धुडगूस घातला. समाजवासियांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्या समाजकंटकांवर कोतवली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून अद्यापही त्या समाजकंटकांना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, नगर तालुक्यातील शिराढोण येथे जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक अतिशय जल्लोषात व उत्साहात पार पडल्याचे काही समाजकंटकांना देखावले नाही व त्याचा राग धरून 16 एप्रिल रोजी बौद्ध वस्तीमध्ये काही समाजकंटकांनी येऊन समाजवासीयांना जातीवाचक शिवीगाळ केली. महिलांना धक्काबुक्की करत पुरुषांना मारहाण केली गेली.
सदरील घटनेचा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला नाही.
या घटना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून जातीयवाद पुन्हा मान वर काढत असून दोन्ही घटनेचा गांभीर्याने तपास करून जातीयवाद समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश भाऊ बनसोडे, अजय साळवे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, बाली बांगरे, अक्षय भिंगारदिवे, सुजन भिंगारदिवे, पवन भिंगारदिवे, नीलेश शिंदे, स्वप्निल खरात, वैभव जाधव, येसुदास वाघमारे, चेतन कांबळे, सागर परदेशी, बंटी भिंगारदिवे, राहुल उमाप, सतीश शिरसाट, अतुल भिंगारदिवे, मोना विधाते, सुरेश वैरागर, गणेश गायकवाड, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, आदी उपस्थित होते.