राहुरी : कंटेनर लुटीतील चौघे जेरबंद | पुढारी

राहुरी : कंटेनर लुटीतील चौघे जेरबंद

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : भर दिवसा कंटेनर चालकाच्या गळ्याला सुरा लावून कंटेनरसह 24.41 लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला होता. दरम्यान, पोलिसांनी नाकाबंदी करीत पाठलाग करून कंटेनर व मुद्देमालासह चौघांना अटक केली. एकजण पसार झाला. हा सिनेस्टाईल थरार नगर-मनमाड राज्य महामार्गावर चिंचोली फाटा येथे (दि. 16 एप्रिल) रोजी घडला.

याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात पाच जनांविरोधात आर्म अ‍ॅक्टसह रस्ता लूट, दरोडा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश बाळासाहेब तांबे, विकास संजय झिंजुर्डे, नितीन शरद बोर्डे, (तिघेही रा. देसवंडी, ता. राहुरी), समीर बशीर शेख (रा. पिंप्री अवघड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अरुण मोरे (रा. लोणी, ता. राहाता) असे पसार आरोपीचे नाव आहे.

16 एप्रिल रोजी सकाळी 7ः30 वाजता नगर- मनमाड महामार्गावर चिंचोली फाटा येथे पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या दरोडेखोरांनी कंटेनर (क्रमांक एम. एच. 23 ए. क्यू. 1571) समोर सिने स्टाईल दुचाकी आडवी लावली. कंटेनरच्या केबिनमध्ये घुसून चालक विकास सुधाकर शिरसाट (वय 39 वर्षे, रा. टेंभुर्णी, पो. घाटशिरस पारगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड) कंटेनर चालच्या गळ्याला सुरा लावला.

जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोकड 2,200 रुपये काढून घेतले. कंटेनरसह पोहे, मुरमुरे हा मुद्देमाल घेऊन लटारु कंटेनर सुसाट वेगाने राहुरीमार्गे शनि शिंगणापूर रस्त्याने घेऊन गेले. दरम्यान, कंटेनर चालकाने कोल्हार येथून 112 नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाण्यात भेट देऊन तपासाची सूत्रे फिरविली.

पो. नि. मेघशाम डांगे, पोउनि सज्जन नार्हेडा, पो. कॉ. गणेश सानप, जालिंदर साखरे यांच्या पथकाने कंटेनरचा पाठलाग केला. राहुरी- शनि शिंगणापूर रस्त्यावर पिंप्री अवघड जवळ रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूच्या रस्त्यावर पथकाने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दीड लाख रुपयांची बुलेट (एम एच 17 सीटी 4189), दुचाकी व कंटेनरसह चौघांना जेरबंद केले.

बुलेट आडवी लावून सिनेस्टाईल लूट..!
भर दिवसा बुलेट कंटेनरला आडवी लावून सिनेस्टाईलने आलेल्या लुटारुंनी कंटेनर चालकाच्या गळ्याला सुरा लावला. जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील 2,200 रुपयांची रोकड काढली. चालकास कंटेनरमधून उतरून दिले. 20 लाखांचा कंटेनरसह 2.41 लाखाचे पोहे, मुरमुरे हा मुद्देमाल घेऊन आरोपी कंटेनर सुसाट वेगाने राहुरीमार्गे शनिशिंगणापूर रस्त्याने घेऊन गेले, परंतु नागरिकांच्या साह्याने पोलिसांनी पकडले.

Back to top button