नगर : जलजीवन मिशनच्या 188 योजनांना ब्रेक..!

नगर : जलजीवन मिशनच्या 188 योजनांना ब्रेक..!
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने 31 मार्च 2024 पर्यंत 'जलजीवन' पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. नगरमध्येही कागदावर तशी घोडदौड सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कार्यारंभ आदेश दिलेल्या 829 पैकी अद्याप 188 योजनांच्या कामांना ठेकेदारांनी सुरुवातच केलेली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावूनही 'ती' कामे बंदच आहेत. त्यामुळे प्रशासनाचा ठेकेदारांवर धाक राहिला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेतून जलजीवन मिशनमधील योजनांसाठी 1350 कोटींपेक्षा अधिक निधी केंद्र व राज्याने दिला आहे. त्यातील 829 योजनांचा कार्यारंभ आदेशही दिला आहे. दुरुस्ती अथवा विस्तारीकरणाची कामे 31 जून 2023 पर्यंत पूर्ण करावीत व नवीन कामे ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करवीत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.

कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांनीही तशा सूचना ठेकेदारांना केल्या आहेत. त्यातील 829 पैकी 633 कामे संथगतीने सुरू असून, आतापर्यंत केवळ 8 कामे पूर्ण झाली आहेत. अनेक योजनांच्या अजूनही तक्रारी सुरूच आहेत. असे असताना 188 योजनांची कामे अजून सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे या योजना मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.

अकोले, संगमनेरात जागांची अडचण
संगमनेर व अकोले तालुक्यात वन विभाग, आदिवासी विभागाकडून जागा मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे काही योजनांची कामे सुरू न झाल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत आहे.

आराखड्यात जलस्रोतांची निश्चिती नाही?
मुळातच योजनेचा आराखडा तयार करतानाच जलस्रोतांची जागा निश्चित केली नाही. तसेच विभागातील अधिकार्‍यांनी ठेकेदारांकडूनच योजनांचे आराखडे तयार करून घेतल्यामुळे आता जागांची समस्या उद्भवत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी प्रशासन जबाबदार आहे.

अकरा महिन्यांत 'जलजीवन'चे आव्हान
या योजना पुढील वर्षी 31 मार्च 2024 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी आता केवळ अकरा महिने उरले असून एवढ्या कालावधीत या योजना कशा पूर्ण होणार, याची प्रशासनाला चिंता असणार आहे.

संगमनेर व अकोले तालुक्यात काही योजनांना जागांच्या अडचणी आहेत. कुठे जलस्रोत ओढ्यात, नदीत असल्याने त्या ठिकाणीही समस्या जाणवतात. यातून मार्ग काढला जात आहे. प्रसंगी ठेकेदारांवर कारवाईही केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच या योजनाही सुरू होतील.
                                – श्रीरंग गडदे,कार्यकारी अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news