आमदारांच्या नावाने ‘झोल’! ई सेवा केंद्रात आ. तनपुरे, जगताप यांच्यासह बनावट शिक्के

आमदारांच्या नावाने ‘झोल’! ई सेवा केंद्रात आ. तनपुरे, जगताप यांच्यासह बनावट शिक्के
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : तहसीलमधून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेले आमदार, सिव्हील सर्जन, मुख्याध्यापकांच्या शिफारसपत्रावर बनावट शिक्के व त्यावर बोगस सही असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हवे ते प्रमाणपत्र काढण्यासाठी हे बनावट शिफारस पत्र देणार्‍या ई-सेवा केंद्राचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पारिजात चौकाजवळील समतानगरात असलेल्या महा ई-सेवा केंद्रावर हा 'उद्योग' अनेक दिवसांपासून सुरू होता.

माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, सिव्हील सर्जन, महानगरपालिकेच्या शाळेचे मुख्याध्यापकांचे बनावट शिक्के व सही असलेले शिफारसपत्र परस्पपर ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी अपलोड केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शासकीस कामासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या प्रमाणपत्रांसाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारसपत्राची आवश्यकता असते.

मात्र, हे शिफारसपत्र प्रत्यक्ष आमदारांकडून न घेता ई-सेवा केंद्रातच बनावट शिक्के व सहीचा वापर करून तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे. रहिवाशी दाखला, जन्माचा दाखला, चारित्र्याचा दाखला यावर आमदारांच्या नावाचे बोगस स्टॅम्प, सही करून प्रमाणपत्र काढले जात होते. आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रमाणपत्र काढण्यासाठी लागत असलेल्या सिव्हील सर्जन यांच्या शिफारस पत्रावरही बनावट शिक्का व सही मारून प्रमाणपत्रासाठी अर्ज अपलोड केले जात होते.

त्यासोबतच महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 येथील मुख्यापकांचाही बनावट शिक्का व सही करून शासनाची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके व पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली.
दोघांना घेतले ताब्यात हारुण हबीब शेख (रा.वरवंडी,राहुरी) आणि दादा गोवर्धन काळे (रा.निंबोडी,नगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महा ई-सेवा केंद्र, निंबोडी नावाचे हे केंद्र तिघे चालवत असल्याचे समजते.

कम्प्युटर, लॅपटॉप जप्त
तोफखाना पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सेवा केंद्रातील स्टॅम्प, कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यासोबतच एक कम्प्युटर, दोन लॅपटॉप, एक थम्ब मशिन असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news